- बाबूराव चव्हाण
धाराशिव : एका नामांकित कंपनीत इंजिनिअरची नाेकरी हाेती. अचानक ही नाेकरी गेल्यानंतर पैशांची चणचण निर्माण झाली. पैशांची ही गरज भागविण्यासाठी चक्क टेलिकाॅम कंपन्यांच्या टाॅवरचे साहित्य चाेरीकडे वळलेल्या ‘त्या’ इंजिनिअरला बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाई येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ६५ हजार रूपये किमतीची इलेक्ट्रिक उपकरणेही हस्तगत करण्यात आली. पुढील तपासासाठी त्यास ग्रामीण पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
येडशी येथील इंडस कंपनीच्या टाॅवरवर लावलेला एअरटेल कंपनीचा आय वेन डिव्हाईस डिश ॲँटेना चाेरीस गेला हाेता. ही घटना समाेर आल्यानंतर धाराशिव ग्रामीण पाेलिस ठाण्यात १७ मार्च राेजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला. यापूर्वीही अशा स्वरूपाच्या चाेरीचे गुन्हे वेगवेगळ्या ठाण्यात नाेंद आहेत. वाढत्या घटना लक्षात घेता, पाेलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पाेनि विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपाेनि कासार यांना तांत्रिक विश्लेषणातून गुन्हा करणाऱ्या इसमाची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाई येथे दाखल हाेत राजेश आचार्य नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चाैकशी केली असता, धक्कादायक बाब समाेर आली. राजेश हा एका नामांकित कंपनीत इंजिनिअर म्हणून कामास होता. नोकरी गेल्यानंतर पैशांची चणचण निर्माण झाली हाेती. पैशांची ही गरज भागविण्यासाठी त्याने येडशी, सांजा, मार्डी आणि मसला या ठिकाणी असलेल्या टाॅवरवरील इंटरनेटसाठी उपयोगी असलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण-३०० चाेरी केल्याची कबुली दिली. त्याने एकूण सहा उपकरणे चोरली असल्याचे तपासातून समाेर आले. यानंतर त्याच्याकडून चाेरलेली इलेक्ट्रिक उपकरणे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. पुढील तपासासाठी त्यास ग्रामीण पाेलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.
अभियंत्याविरूद्ध यापूर्वी चार गुन्हेअभियंता राजेश आचार्य याच्याविरुद्ध यापूर्वी चाेरीचे चार गुन्हे नाेंद असल्याचे पाेलिसांनी केलेल्या अभिलेख तपासणीतून समाेर आले आहे.
सव्वादाेन लाखांचा मुद्देमालअभियंता आचार्य यास ताब्यात घेतल्यानंतर पाेलिसांनी त्याच्याकडून १ लाख ६५ हजार रूपये किमतीची इलेक्ट्रिक उपकरणे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २ लाख ३५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.