उमरगा : दोन वर्षांपूर्वी परीक्षा उत्तीर्ण होऊनदेखील नोकरी मिळाली नसल्याने स्वप्निल लोणकर यांनी आत्महत्या केली. त्यामुळे या आत्महत्येस शासनाचा नाकर्तेपणाच जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाने केला आहे. तसेच शासनाने त्वरित एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीत रुजू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा भाजपा युवा मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे.
तहसीलदारांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवाराबाबत गंभीर नाही, हेच राज्य सरकार या घटनेवरून लक्षात येते. स्वप्निल लोणकर यांच्या मृत्यूला राज्य शासनच जबाबदार आहे. अशी वेळ कोणत्याही विद्यार्थ्यावर येऊ नये. यावेळी युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रोहित सूर्यवंशी, भाजपा तालुका उपाध्यक्ष श्रीराम राठोड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पंकज मोरे, विधी आघाडी तालुकाध्यक्ष ॲड. सुशीलकुमार शिंदे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस आकाश जाधवर, आनंद मुरमे, यशवंत कोथिंबीरे, सुमित हिंडोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.