कारी : गावाच्या विकासाच्या अनुषंगाने विविध विभाग प्रमुखाशी चर्चा करून तात्काळ आवश्यक निर्णय घेऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तालुक्यातील कारी येथे दिली.
कारी या गावाचा १ ऑगस्ट २०१९ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात समावेश झाला; परंतु समावेशापासून गावचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी या गावाला भेट देऊन कोरोनाचे नियम पाळत विशेष बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी प्रथमच गावात आले असल्याने गावकऱ्यांच्या वतीने फळाचे रोप देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार गणेश माळी, सहायक गटविकास अधिकारी सुरेश तायडे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी, विस्तार अधिकारी संजय कळसाईत, आरोग्य विस्तार अधिकारी रमाकांत हजारे, सीएचओ पूजा हिंगे, सांख्यिकी विस्तार अधिकारी उदयसिंह चौरे, मंडळ अधिकारी अनिल तीर्थकर, ग्रामविकास अधिकारी अनंत सोनटक्के, तलाठी अमर पडवळ, सरपंच नीलम कदम, उपसरपंच खासेराव विधाते, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत महसूल, शिक्षण, आरोग्य, महिला बाल कल्याण, पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे आदी विभागांबाबत चर्चा झाली. प्रस्ताविक ग्रामसेवक अनंत सोनटक्के यांनी केले.