वडगाव सिद्धेश्वर उपकेंद्रांतर्गत सहा गावे व तेरा वाडी-वस्त्यांवरील रुग्णांना सेवा दिली जाते. नाममात्र शुल्कात सेवा मिळत असल्याने रुग्णांची संख्याही माेठी आहे. हीच बाब लक्षात घेऊन स्वतंत्र इमारत उभी करण्यात आली. या इमारतीलाही जवळपास ४० ते ४५ वर्षांचा कालावधी लाेटला आहे. त्यामुळे वेळाेवेळी डागडुजीही करण्यात आली. परंतु, ही कामे करताना गुणवत्तेकडे फारसे लक्ष दिले नाही, असा आराेप ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळेच की काय, सध्या सुरू असलेल्या पावसात इमारतीला गळती लागली आहे. डॉक्टरांची खोली, औषध वाटप व नोंदणी कक्ष, प्रसूतिगृहात पाणी साचत आहे. परिणामी डाॅक्टर तसेच कर्मचारी जीव मुठीत धरून कामकाज करीत आहेत. ही समस्या लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांसह रुग्णांतून केली जाऊ लागली आहे.
प्रतिक्रिया..
आराेग्य उपकेंद्राच्या इमारतीस ४५ वर्षांपक्षा जास्त कालावधी झाला आहे . त्यामुळे गळतीसारखे प्रकार घडत आहेत. वेळोवेळी रुग्ण कल्याण व पंचायत समितीच्या बैठकीत या इमारतीच्या दुरुस्तीविषयी संबंधिताना कळविले आहे. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन इमारतीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
-गजेंद्र राजेंद्र जाधव, सदस्य, पंचायत समिती, उस्मानाबाद.