कळंब : शहरातील चर्मकार समाजबांधवानी संत श्री रविदास महाराजांच्या मंदिरासाठी केलेल्या जागा मागणीची दखल घेऊन नगरपरिषदेने या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. मंदिरासाठीच्या जागेचे पत्र नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांच्या हस्ते व उपाध्यक्ष संजय मुंदडा, नगरसेवक लक्ष्मण कापसे, अमर गायकवाड, शकील काजी, महेश पुरी, सागर मुंडे यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघ उस्मानाबाद युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम व चर्मकार समाजबांधवांना दिले.
चर्मकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत गुरू रविदास महाराज यांचे कळंब शहरांमध्ये मंदिर होण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम व शहरातील चर्मकार बांधवांनी कळंब नगरपालिकेकडे रविदास महाराजांच्या मंदिरासाठी जागेची मागणी केली होती. त्यावेळचे प्रभारी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी सर्वसाधारण सभेमध्ये मंदिरासाठी ठराव घेऊन जागा देण्याचे योजिले होते. त्यानुसार श्री संत रविदास महाराज मंदिरासाठी नगरपालिकेने सर्वे क्रमांक १०२/ब/२ या ठिकाणची जागा उपलब्ध करून दिली.
यावेळी रंगनाथ कदम, प्रा. जालिंदर लोहकरे, रुपचंद लोहकरे, सुदाम शिंदे, अशोक वाघमारे, विनोद कांबळे, राम लोहकरे, दयानंद शिंदे, ताटे मामा, शिवाजी शिंदे, बाळासाहेब भोसले, मेघराज लोहकरे व बहुसंख्य चर्मकार समाज उपस्थित होता.
चौकट-
कळंब शहरांमध्ये श्री संत गुरू रविदास महाराजांचे मंदिर व्हावे, अशी कळंब शहर व तालुक्यातील समस्त चर्मकार समाजाची इच्छा होती. खूप वर्षांपासून समाजाचे हे स्वप्न होते. आज आमचे आराध्य दैवत संत रविदास महाराज यांच्या मंदिरासाठी नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यामुळे आमचे रविदास महाराजांच्या मंदिराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
- विकास कदम, युवक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ उस्मानाबाद