कळंब : येथील नगर परिषद व धनेश्वरी शिक्षण समुहाच्या पुढाकारातून कळंब येथे ५० खाटांचे कोविड केअर सेंटर चालू करण्यास जिल्हा प्रशासनाने सोमवारी परवानगी दिली .यामुळे आगामी काळात दुर्दैवाने कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी कळंब येथेच काही प्रमाणात उपचार उपलब्ध होणार आहेत.
कोरोनाची तालुक्यातील विद्यमान परिस्थिती व संभाव्य कोरोना लाट जरी आली तरी तालुक्यातील नागरिकांना कळंब येथे किमान प्राथमिक उपचार मिळावे यासाठी नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, धनेश्वरी संस्थेचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ५० खाटांचे कोविड सेंटर चालू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. याला ११ मे रोजी मंजुरीही मिळाली. परंतु, आदेशात नगर परिषदचा उल्लेख नसल्याने हे कोविड सेंटर चालू केले तर नगर परिषद व धनेश्वरी शिक्षण समूहालाही तांत्रिक अडचणीबरोबरच या ठिकाणी निधी खर्च करण्यात अडचणी येणार होती. ही बाब प्रशासनाच्या नजरेस आणून दिल्यानंतर या कोविड सेंटरच्या सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. त्यास सोमवारी जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.
या ठिकाणी सर्व सुविधा आता कळंब नगरपरिषद व धनेश्वरी शिक्षण समूहाने पुरवाव्यात असे जिल्हाधिकारी यांनी आज नव्याने निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
चौकट -
उत्तम सुविधांसाठी प्रयत्न
कळंब नगर परिषद व धनेश्वरी शिक्षण समूह यांच्या संयुक्त कोविड उपचार केंद्राला सोमवारी सुधारित मान्यतेचा आदेश मिळाला. केंद्रातील सुविधा, व्यवस्था आदींबाबत विविध पातळीवर चर्चा सुरु आहे. याठिकाणी रुग्णांना उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. आगामी आठ दिवसात म्हणजे सोमवारपर्यंत हे केंद्र रुग्णांसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे व उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी दिली.