तुळजापूर : उस्मानाबाद-सोलापूर राष्ट्रीय बायपास महामार्गावर शहराजवळील आपसिंगा रस्त्यावरील उड्डाण पुलाशेजारचा हायमस्ट खांबावरील दिवा मागील चार महिन्यांपासून बंद आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांसह नागरिकांची गैरसोय होत आहे.
तुळजापूर-आपसिंगा या रस्त्यावर दररोज पहाटे अनेक ज्येष्ठ नागरिक व तरुण फिरण्यासाठी जातात. या रस्त्यावर टोल ठेकेदाराने राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या सुरक्षिततेसाठी उड्डाण पुलानजीक हायमस्ट पोलवर सहा दिवे बसविले आहेत, परंतु ते मागील चार महिन्यांपासून बंद असल्याने, सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या महिला व ज्येष्ठांना अंधारात चाचपडावे लागते, तसेच या रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा प्रचंड वावर असून, जागोजागी खड्डेही पडले आहेत. या उड्डाणपुलावरून अज्ञात व्यक्ती चालत्या वाहनावर सहज उडी मारू शकतात. त्यामुळे त्या वाहनातील मालाचा व चालक्याच्या सुरक्षितेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधित टोल ठेकेदाराने लवकरात लवकर हायमस्ट पोलवरील सर्व दिवे चालू करावेत, अशी मागणी होत आहे.