गुणवंत जाधवर / उमरगा (जि.उस्मानाबाद) : शहरापासून दूर तांड्यावरची लेकरं त्यांचे विद्यार्थी. जिथे मोबाइल नेटवर्कच्या नावाने कायमच शिमगा. अशावेळी परिस्थितीशी संघर्ष करीत शिकण्याची धडपड करणाऱ्या पोरांचे शिक्षण थांबू नये, यासाठी ऑफलाइन ॲप बनवून त्यातून वर्षभर ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षक उमेश खोसे यांच्या कर्तृत्वावर अखेर केंद्राच्या राष्ट्रपती पुरस्काराची मोहोर उमटली.
उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबानगर येथे कार्यरत असलेले शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने देशातील ४५ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला. यात महाराष्ट्रातील उमेश खोसे यांना हा बहुमान मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी ज्या तांड्यावर साधी मोबाइलला रेंज नव्हती आशा तांड्यावर मुलांना ऑफलाइन शिकता यावे, मनोरंजक अध्ययन करता यावे यासाठी ५१ ऑफलाइन ॲपची निर्मिती केली आहे. तसेच मुलांच्याच सहाय्याने व्हिडिओ निर्मिती करून मुलांना स्वयं अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तांड्यावरील मुलांना त्यांच्याच बोली भाषेतून शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्या बंजारा बोली भाषेत पहिलीचे पुस्तक अनुवादित करून त्याच भाषेत डिजिटल साहित्य निर्माण केले. बोलीभाषा व तंत्रज्ञान या उपक्रमाची निवड राज्यस्तरावरील शिक्षणाची वारी या उपक्रमात झाली होती. खोसे यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादरीकरण केले आहेत. त्यांची ५ पुस्तके व ४७ लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी दीक्षा या केंद्र शासनाच्या ॲपवर ई-कंटेंट तयार केले आहेत. खोसे व त्यांचे मुख्याध्यापक श्रीराम पुजारी यांनी राबविलेल्या शिक्षण संस्कार शिबिर या नवोपक्रमास राज्यात प्रसिद्धी मिळाली आहे. ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या लोकांनी दिलेले योगदान, तसेच ग्रामपंचायत व इतर संस्थेच्या माध्यमातून लोकवाट्यातून त्यांनी शाळा डिजिटल बनविल्या. टॅब स्कूल या उपक्रमातून मुले वेगवेगळे ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरून आनंददायी शिक्षण घेऊ लागले आहेत.
निकाल लावला ऑनलाइनच...
कोरोनाच्या काळात त्यांची शाळा ऑनलाइन व ऑफलाइन ३६५ दिवस सुरू आहे. मुले दीक्षा ॲप तसेच इतर साधनांच्या सहाय्याने नियमित शिक्षण घेत आहेत. अशा काळात त्यांनी शाळेची स्वतःची वेबसाईट तयार करून दोन्ही वर्षी दहावी-बारावीप्रमाणे शाळेचा ऑनलाइन निकाल लावला आहे. ऑनलाइन निकाल लावणारी कडदोरा ही जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषदेची शाळा आहे. उमेश खोसे यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर शिक्षण क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
कोट...
परिस्थितीशी झगडत शिक्षणाच्या प्रवाहात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची ओढ पाहून आत्मीय तळमळीने कामाला लागलो. शक्य तेथे तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना समजेल अशा बोलीभाषेतून ज्ञानदानास प्राधान्य दिले. माझ्या सर्व वरिष्ठांनी या प्रयत्नांत मोलाची साथ दिल्यानेच हा अत्युच्च सन्मानाचा क्षण आज माझ्या आयुष्यात येऊ घातला आहे.
-उमेश खोसे, शिक्षक, जि.प. शाळा, कडदोरा, जि.उस्मानाबाद