परंडा : तालुक्यात यावर्षी ४९ सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, तसेच गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आढावा घेत आहेत. गणेशोत्सव काळात तीन पोलीस अधिकारी, ५० पोलीस कर्मचारी, ३० होमगार्ड बंदोबस्ताकरिता तैनात केले आहेत.
सार्वजनिक मंडळांनी समाजोपयोगी उपक्रमावर भर द्यावा, अत्यंत साध्या पद्धतीने छोटा मंडप टाकून सार्वजनिक रहदारीस कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाची निर्मिती करावी, याबाबतच्या सूचना पूर्वीच पोलीस प्रशासनाकडून मंडळांना दिलेल्या आहेत. याचे मंडळाकडून तंतोतंत पालन होताना दिसून येत आहे. शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे, तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, मुख दर्शनाऐवजी प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध घालण्यात यावा, केवळ ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गिड्डे यांनी मंडळांना केले आहे.
चौकट ......
पोलिसांनाही सूचना...
पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी सहायक पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव काळात गणेश मंडपामध्ये अवैध धंद्यांना प्रतिबंध घालण्यासोबतच बऱ्याच दिवसापासून फरार आरोपींबाबत स्पेशल कारवाई करावी. विशेषत: शहरात चैनस्नेचिग, छेडछाड होणार नाही याकरिता साध्या पोशाखात काही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आठवडा बाजार, मंडई पेठेसह मुख्य चौकात वाहतुकीचा अडथळा होऊ नये याकरिताही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलीस व्हॅनमधून सतत पेट्रोलिंग करण्यात येत आहे.
चौकट....
२५ गावांत ‘एक गाव एक गणपती’
पोलीस ठाणे हद्दीत एकूण ४९ गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये एक गाव एक गणपती २५, परवानाधारक १०, विना परवानाधारक १२, एक वार्ड एक गणपतीची संख्या २ इतकी आहे. गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश पोलीस निरीक्षकांनी सहायक निरीक्षक यांना दिले आहेत. यंदादेखील कोरोनाच्या सावटाखाली उत्सव साजरा होत आहे. मात्र, या दरम्यान कुठेही गडबड गोंधळ होणार नाही, तसेच जुने वाद उफाळून येणार नाहीत यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे.
कोट....
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने ७० उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाया सुरू आहेत. गणेशोत्सव सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना बैठकीच्या माध्यमातून महावितरणला देण्यात आलेल्या आहेत. गणेश मंडळांना समाजोपयोगी उपक्रमावर भर देण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
- सुनील गिड्डे, पोलीस निरीक्षक, परंडा