उस्मानाबाद : बाबाकडे हट्ट धरल्यानंतर नवीकाेरी सायकल दारात उभी केली. त्यामुळे मुलाचा आनंद गगनात मावला नाही. मात्र, हा आनंद चार दिवसही टिकला नाही. कारण रात्रीच्या अंधाराची संधी साधून घराच्या आवारातून ही सायकल लंपास केली. बच्चे कंपनीच्या अशाच पाच ते सहा सायकली शनिवारी रात्री बॅंक काॅलनीतून चाेरीला गेल्या आहेत.
शहरातील बॅंक काॅलनीतील रहिवासी शरद मुंडे यांनी आपल्या मुलासाठी साडेसहा हजार रुपये खर्च करून नवीकाेरी सायकल खरेदी केली. त्यामुळे मुलगाही आनंदी झाला. तीन-चार दिवस मनसाेक्त आनंद लुटल्यानंतर या सायकलवर चाेरट्यांची नजर गेली. शनिवारी रात्री घराच्या आवारात उभी केलेली सायकल अज्ञात चाेरट्यांनी लंपास केली. साेबतच गल्लीतील अन्य पाच ते सहा मुलांच्या सायकली याच रात्री चाेरीस गेल्या आहेत. त्यामुळे शहरामध्ये सायकल चाेरांची टाेळी तर सक्रिय झाली नाही ना, असा प्रश्न पालकांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे.