आठवडी बाजाराच्या प्रश्नावरही चर्चा
उमरगा : शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत वाढलेल्या अतिक्रमणाचा विळखा सैल करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासाठी मंगळवारी येथील पोलीस ठाण्यात महामार्ग प्राधिकरण, पालिका, पोलीस आणि व्यापारी महासंघाची संयुक्त बैठक पार पडली. यात महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाढलेले अतिक्रमण काढण्यासोबतच आठवडी बाजाराच्या प्रश्नावरदेखील चर्चा झाली. दरम्यान, गुरुवारी अतिक्रमणे हटविली जाणार असून, तत्पूर्वी व्यापाऱ्यांनी स्वत:हून ती काढून घ्यावीत, अशा सूचना संबंधिताना दिल्या जाणार आहेत. उमरगा शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने हातगाडे, फेरीवाले, ॲाटोरिक्षा थांबे यासोबतच दुकानदारांचीही अतिक्रमणे वाढली आहेत. यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यासंदर्भात पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी महामार्ग प्राधिकरणाची प्रमुख भूमिका असून, पालिका व व्यापाऱ्यांचे सहकार्यदेखील अपेक्षित असल्याने मंगळवारी ही बैठक घेण्यात आली. यावेळी अतिक्रमण हटवण्याविषयी झालेल्या चर्चेत छोट्या व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे, आठवडी बाजाराच्या दिवशी राष्ट्रीय महामार्गावर होणारी भाजी विक्री थांबविणे, हातगाडे, दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था, चारचाकी वाहन थांब्यासाठी पर्यायी जागा, भाजी लिलावासाठी जागा, ॲटोरिक्षासाठी पर्यायी जागा यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. जुन्या सरकारी दवाखान्याच्या जागेत भाजी विक्री तर मुळज रोडलगत असलेल्या आठवडे बाजारात भाजी लिलाव करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, तसेच दुचाकी पार्किंगसाठी गट शिक्षण कार्यालयाचे मैदान निश्चित करण्यात आले.
बैठकीस महामार्ग प्राधिकरणाचे प्रबंधक (तांत्रिक) मिलिंद वागळे, एसटीपीएलचे तांत्रिक प्रमुख संजय सिंग, वरिष्ठ व्यवस्थापक अजिंक्य महाडिक, नगराध्यक्ष प्रेमलता टोपगे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधव, अतिक्रमण विभागप्रमुख एम.आर. शेख, तुळशीदास वऱ्हाडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधिर पवार, कार्याध्यक्ष नितिन होळे, उपाध्यक्ष प्रदीप चालुक्य, सचिव शिवप्रसाद लड्डा, सिद्रामप्पा चिंचोळे, महेश आळंगे, राम बोधे आदींची उपस्थिती होती.
चौकट......
अधिकाऱ्यांनी घेतली कंत्राटदाराची बाजू
यावेळी शहराबाहेरून काढण्यात आलेल्या बायपास रोडवरील मुळज रोड, त्रिकोळी रोड येथे रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग काढण्यात आला नसल्याने रस्ता ओलांडताना सातत्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे तेथे भुयारी मार्ग करण्याची मागणी सिद्रामप्पा चिंचोळे, नितीन होळे यांनी केली. यावर महामार्ग प्राधिकरणचे प्रबंधक (तांत्रिक) मिलिंद वागळे यांनी एसटीपीएल या कंत्राटदार कंपनीची बाजू घेत संबंधित कंपनी आर्थिक अडचणीत आहे. त्यांना जरा वेळ द्या, असे सांगितले.
खुद्द रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या कंपनीची आर्थिक बाजू बघून यांना मुदतवाढ दिली आहे व येत्या दहा महिन्यात परत एकदा जनसुनावणी घेऊन जनतेची मागणी पाहून कामे केली जाणार असल्याचे सांगितले.
तसेच २०१० साली या मार्गाचे काम सुरू करताना या ठिकाणी भुयारी मार्गाची गरज जाणवली नव्हती; परंतु आता होणारे अपघात पाहता याठिकाणी भुयारी मार्ग करण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.