वाशी : येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीवरील प्रशासक नियुक्तीच्या आदेशास लातूर येथील विभागीय सहनिबंधकांनी अंतरिम स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही २७ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली असून, तीन महिन्याचा कालखंड राहिलेल्या सोसायटी चेअरमनपदावरून शहरात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये वाशी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची मुदत संपत आहे़ या सोसायटीचे संचालक मंडळ हे सर्वपक्षीय असून, ते बिनविरोध काढण्यात आले होते़ चेअरमन पदाचा कालावधी पहिल्या तीन वर्षासाठी वषाÊसाठी काँग्रेसकडे तर यानंतरच्या चौथ्या वर्षी शिवसेना व पाचव्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असे ठरले होते. दरम्यान, काँग्रेसचे प्रशांत चेडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे याठिकाणी काँग्रेसचे प्राबल्य संपले़ पहिल्या तीन वर्षासाठी चेअरमन म्हणून छगनराव मोळवणे यांची नियुक्ती झाली होती तर चौथ्या वर्षी नानासाहेब मोळवणे यांच्याकडे चेअरमनपदाची सूत्रे आली होती. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक चेअरमनपदी विराजमान होणार होते. मात्र, विद्यमान चेअरमन नानासाहेब कवडे व प्रशांत चेडे गटाच्या संचालकांत दुफळी निर्माण झाली़ त्यातच लक्ष्मणराव परंडकर व रमेश नन्नवरे यांना विविध कारणास्तव संचालक पदावरून निष्कासित करण्यात येवून त्यांच्या जागी नवनाथ भांडवले व कल्याण बनसोडे यांची वर्णी लागली होती.
दरम्यान, लक्ष्मणराव परंडकर, छगनराव मोळवणे, संतोष उंदरे, रमेश नन्नवरे, विमलबाई उंदरे, सुमनबाई जगताप व वैजिनाथ माळी यांनी संचालक पदाचे राजीनामे दिले. १३ पैकी सात सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे संचालक मंडळ हे अल्पमतात गेले असल्याचे सांगत नानासाहेब कवडे यांचे संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी काही संचालकांनी केली. यावरून २१ सप्टेंबर रोजी वाशीचे सहाय्यक निबंधक राहूल गुरव यांनी हे संचालक मंडळ निष्प्रभावित करत प्रशासक म्हणून स्वत:ची नियुक्ती केली होती़
सहाय्यक निबंधक गुरव यांच्या या आदेशाविरूध्द नानासाहेब मोहनराव कवडे यांनी ॲड. एस. एस. सांडसे यांच्या मार्फत लातूरच्या विभागीय निबंधकाकडे दाद मागितली होती़ विभागीय निबंधकांनी विमलबाई उंदरे व सुमनबाई जगताप यांच्या सह्यात तफावत तर लक्ष्मणराव परंडकर व रमेश नन्नवरे यांना अपात्र केल्याचे सांगत सहाय्यक निबंधकांच्या आदेशास २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे़