जेवळी : तुळजापूर तालुक्यातील १७ सदस्यीय जळकोट ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचा पराभव झाला असून, येथे २० वर्षानंतर सत्तांतर झाले. या निवडणुकीत तीन माजी सरपंचानी विजय मिळवला आहे.
जळकोट ग्रामपंचायतवर गेल्या २० वर्षापासून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश सोनटक्के यांचे वर्चस्व होते. या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून त्यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर माजी सरपंच अशोकराव पाटील बहुजन महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बहुजन महाविकास आघाडीने १७ पैकी ११ जागेवर विजय मिळवित सत्ता काबीज केली. गणेश सोनटक्के यांच्या पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले. निवडणुकीत माजी सरपंच अशोकराव पाटील, रेखा संजय माने, शोभा संजय अंगुले तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनीही विजय मिळविला. निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
विजयी उमेदवारामध्ये बहुजन महाविकास आघाडीतील गजेंद्र पाटील, राजश्री कागे, उज्ज्वला भोगे, प्रशांत नवगिरे, श्रीदेवी कवठे, अशोकराव पाटील, जीवन कुंभार, सुरेखा माळगे, दिपा कदम, कल्याणी साखरे, अंकुश लोखंडे यांचा समावेश आहे. तर ग्रामविकास पॅनलमधून रेखा माने, सलीम जमादार, गुरूदेवी दरेकर, शोभा अंगुले, सय्यद तांबोळी, सुकमार जाधव हे विजयी झाले.