उमरगा : तालुक्यात आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती केंद्र बंद करण्यात आल्याने नागरिकांची सध्या मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे हे केंद्र त्वरित चालू करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सद्यस्थितीत तालुक्यात उमरगा शहरातील महाराष्ट्र बँक व सुंदरवाडी येथील एक असे दोन केंद्र सुरु असून, इतर केंद्र बंद आहेत. आधार कार्ड हे सर्व शासकीय, प्रशासकीय, बँकिंग कामासाठी महत्त्वाचे असून, केंद्र बंद असल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती केंद्र चालू करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, जगदीश सुरवसे, सुशील दळगडे, भैया शेख, विद्यार्थी तालुकाध्यक्ष समर्थ सुरवसे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष हाजी सय्यद, बंजारा सेल जिल्हा उपाध्यक्ष प्रताप राठोड, फय्याज पठाण, मोहसीन पटेल, बाळासाहेब बुंदगे, अनिकेत तेलंग, संकेत कुलकर्णी, भरत देडे, सतीश सरवदे, व्यंकट पाटील, माधव मुळे आदींच्या सह्या आहेत.