उस्मानाबाद : सर्वसामान्यांना गॅस सिलिंडरचा वापर करता यावा, म्हणून पंतप्रधान उज्ज्वला योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील ९६ हजार ५९८ कुटूंबाना मोफत गॅस कनेक्शन जोडणी दिली आहे. गॅसच्या किंमती वाढल्याने दारिद्र्य रेषेखालील अनेक कुटुंबे चुलीकडे वळले आहेत.
धुरापासून डोळ्यांचे आजार उद्भवण्याचा अधिक धोका असतो. तसेच श्वसनाचे विकारही जडू शकतात. शिवाय, धुरामुळे प्रदूषणही वाढत असते. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधानांनी उज्ज्वला योजना कार्यान्वित केली आहे. दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आलेली आहे. कोणतीही रक्कम न भरता अल्प उत्पन्न असलेल्या कुटूंबाना गॅस जोडणी दिली जात आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत या योजनेंतर्गत ९६ हजार ५९८ कुटूंबांना गॅस जोडणी देण्यात आली आहे. मात्र, गॅसच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांना गॅस परवडेनासा झाला आहे. त्यामुळे अनेक कुटूंब चुलीकडे वळले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेले उज्ज्वला कनेक्शन
९६५९८
गॅस सिलेंडरचे दर
जानेवारी २०१९ ५५०
जानेवारी २०२० ५९५
जानेवारी २०२१ ७१०
ऑगस्ट २०२१ ८५१
सिलेंडर भरणे कसे परवडणार
शासनानाने उज्ज्वला गॅस कनेक्शन मोफत दिला आहे. मागील दोन वर्षापूर्वी सिलिंडरचे दर कमी होते. तसेच सबसिडीही मिळत होती. मात्र सध्या सबसिडी कमी मिळत आहे. त्याचबरोबर दरही वाढले आहेत. त्यामुळे आता चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.
सुरेखा सोनवणे
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यात गॅसचे दर वरचेवर वाढत आहेत. यामुळे महिलांचे गणित बिघडत आहे.
महानंदा राऊत
सामान्य माणसाला आता कोरोना संकटात जगणे अवघड झाले आहे. सरकारकडूनही महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.
कामिनी देवकते