(फोटो : दयानंद काळुंके १९)
अणदूर : कोरोनाच्या महामारीत स्वत:ची व कुटुंबाची पर्वा न करता रुग्णसेवेत व्यस्त असलेल्या आशा कार्यकर्ती शकुंतला लंगडे यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले. यामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कुटुंबाला आधार मिळावा, यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत त्यांना मदतीचा हात देऊ केला आहे. लंगडे यांच्या कुटुंबात दोन लहान मुले, वृद्ध सासू, वृध्द आई व पती असे सदस्य होते. कोरोनाच्या संकटात गावाची अहोरात्र सेवा करीत असतानाच घरात पतीला कोरोनाची लागण झाली. जवळ उपचाराइतपतही पैसे नसताना गावकऱ्यांच्या मदतीतून जवळपास सहा लाख रुपये खर्च करून त्यांनी पतीवर उपचार केले. परंतु, २३ मे रोजी त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरूष गेल्याने डोक्यावर लाखो रुपयांचे कर्ज, अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी आता कशी पेलवणार, असा प्रश्न शकुंतला यांच्यासमोर होता. ‘लोकमत’नेही वृत्ताच्या माध्यमातून त्यांची ही परिस्थिती समाजासमोर मांडली.
याची दखल घेत त्या कार्यरत असलेल्या आरोग्य खात्यातीलच माणुसकीचे हात पुढे आले. १९ जुलै रोजी उस्मानाबाद, फुलवाडी येथील आशा कार्यकर्ती शकुंतला लंगडे यांना ५८ हजार रुपयांची मदत दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हालगुडे, डॉ. किरण गरड, जीवन कुलकर्णी, सतीश गिरी, हिंगमिरे आदी उपस्थित होते.