तुळजापूर (उस्मानाबाद) : शहरातील जुन्या बस्थानकासमोर असलेल्या शासकीय गोदामाजवळ काक्रंबा येथील तरुणाचा गुरुवारी खून झाला होता. याप्रकरणातील आरोपीस तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने हा खून नात्यातीलच महिलेशी मयताचे असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून केल्याची कबुली दिली आहे.
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील शंकर गायकवाड या युवकाला तुळजापूर येथील शासकीय गोदामात बोलावून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. आरोपींच्या तावडीतून सुटून तो जीव वाचविण्यासाठी रक्ताळलेल्या अवस्थेत पळत सुटला होता. मात्र, वाटेतच कोसळल्याने आरोपींने पाठलाग थांबवून पळ काढला. याप्रकरणी तुळजापूर ठाण्यात सूरज दीपक शिंदे (रा.वेताळ नगर, तुळजापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपीच्या अटकेसाठी जमाव संतप्त झाला होता. पोलीस ठाण्यात बराच काळ ठिय्याही देण्यात आला. दरम्यान, पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी मध्यस्थी करीत आरोपीला सायंकाळपर्यंत अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ठाण्यातून नेण्यात आला. यानंतर पोलिसांनी चक्रे गतिमान करुन आरोपी सूरज शिंदे यास अवघ्या १२ तासात गजाआड केले. रात्रीतून दोन पथके तयार करुन आरोपीचा माग काढणे सुरू केले. उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांची मदत घेत तुळजापूर पोलिसांनी आरोपी सूरज शिंदे यास सुंबा गावाजवळून ताब्यात घेतले.
तो डोक्यात बसला होता...
मयत शंकर गायकवाड याचे आरोपी सूरज शिंदे याच्या नात्यातीलच महिलेशी अनैतिक संबंध होते. वारंवार सांगूनही तो हे संबंध तोडत नव्हता. त्यामुळे शंकरचा काटा काढायचा बेत आखला. त्याला तुळजापुरात शासकीय गोदामाजवळ बोलावून घेत त्याचा खून केल्याची कबुली आरोपी सूरज शिंदे याने दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
300721\img-20210730-wa0046.jpg
तुळजापुर पोलिसांनी आरोपीस केली अटक....यावेळी पोलीस कर्मचारी व अटक आरोपी