वाशी तालुक्यातील पार्डी फाट्यावरील उड्डाणपुलालगत खानापूर येथील हनुमंत रामेश्वर मकाने यांचे किराणा दुकान आहे. जनता कर्फ्यू असल्यामुळे दुकान बंद होते. १८ मे रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर हाती काहीच रोकड न लागल्याने उचकाउचकी करुन पाहिली. त्यानंतर चोरट्यांनी थेट साहित्याकडेच मोर्चा वळविला. दुकानात असलेले जवळपास सर्वच किराणा साहित्य या चोरट्यांनी पळवून नेले. दरम्यान, सकाळी मकाने यांना दुकानाचे कुलूप तोडल्याची माहिती मिळाली. त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता दुकानातील सर्वच साहित्य लंपास झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी वाशी पोलीस ठाणे गाठून दुकानातील सुमारे ७५ हजार रुपयांचे किराणा साहित्य चोरीस गेल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा नोंद केला आहे. तपास उपनिरीक्षक पवन निंबाळकर करीत आहेत.
दुकान फोडून किराणा पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:34 IST