कळंब : तालुक्यातील डिकसळ येथील अंगणवाडीमध्ये गौरी गणपतीचा सण साजरा करण्यात आला. यानिमित्त एकविसाव्या शतकातील ‘लक्ष्मी’ म्हणून दोन विद्यार्थिनींना मान देण्यात आला. यावेळी विद्येचे प्रतीक असलेले पुस्तक हाती घेऊन या विद्यार्थिनींनी गौरीच्या रूपात उभ्या होत्या.
एकात्मिक बाल विकास विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अंगणवाडीमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी यंदाचा महालक्ष्मी सण साजरा करताना विविध नवोपक्रम राबवले. शिक्षण घेतलेली मुलगी ही खऱ्या अर्थाने २१ व्या शतकातील लक्ष्मीच आहे. याशिवाय बालके व मुलीच्या शिक्षण, आरोग्य, आहार संबंधी जनजागृती होणे गरजेच आहे. या उद्देशाने असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. यात डिकसळ येथील अंगणवाडी क्रमांक ११७ मध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आशा जाधव व मदतनीस खंदारे यांनी आपल्या अंगणवाडीत प्रतीकात्मक स्वरूपात दोन विद्यार्थिनींना महालक्ष्मी स्वरूपात उभे करून गौरी गणपतीचा सण साजरा केला.
यावेळी त्या दोन विद्यार्थिनींच्या हातात विद्येचे प्रतीक असलेले पुस्तक देण्यात आली होती. याशिवाय इतरही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी असे विविध उपक्रम राबवले असल्याचे प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांनी सांगितले. ईटकूर येथील अंगणवाडीमध्ये बालकांचे पोषण, कुपोषण, आहार, आरोग्याची काळजी घेणारे संदेश महालक्ष्मीच्या आरासात मांडण्यात आले होते.