बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यात उगम पावणारी मांजरा नदी बीड,ऊस्मानाबाद जिल्ह्याची सीमा बनून प्रवाही होते. याच नदीवर धनेगाव (ता.केज) व दाभा (ता.कळंब) यांच्या शिवेवर १९८० मध्ये मांजरा प्रकल्पाची बांधणी पूर्ण झाली. बीड, ऊस्मानाबाद जिल्ह्यात 'पाणलोट' क्षेत्र असलेला हा प्रकल्प 'महसूली' नोंदीत बीडमध्ये गणला जातो. तर लाभक्षेत्र मोजताना लातूरकरांचा वरचष्मा दिसून येत असल्याने पाणीसाठ्यावर तिन्ही जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झालेले असते. शेतीशिवाय लातूर शहर व औद्योगिक वसाहत, कळंब, अंबाजोगाई, केज अशा विविध शहरं, गावांची हा प्रकल्प तहान भागवतो. हा प्रकल्प यंदा एक सप्टेंबरपर्यंत ९५ दलघमी एवढ्या साठ्यावर अडकला होता. यानंतर चांगला पाऊस झाल्याने पुढील ४ ते १५ सप्टेंबर या दहा-बारा दिवसात तब्बल शंभर दलघमीपेक्षा जास्त साठा वाढला. एकूण २२४ दलघमी क्षमतेच्या या प्रकल्पाने पुढे दोनच दिवसात २०० दलघमीचा पल्ला पार केला. मागच्या चार दिवसात २२० दलघमीच्या दरम्यान असलेला प्रकल्प ओव्हरफ्लोच्या दृष्टीने उत्सुकता वाढवत होता. अखेर मंगळवारी दुपारी प्रकल्प काठोकाठ भरला आहे.
यापूर्वी कधी झाला ओव्हरफ्लो...
मांजरात प्रथम १९८० साली ९७ दलघमी पाणीसाठा झाला. यानंतर १९८८ मध्ये प्रकल्प प्रथम भरला. पुढे १९८९, १९९० असे सलग दोन वर्षे ओव्हरफ्लो होत मांजरा प्रकल्पाने 'हॅटट्रिक' केली होती. याशिवाय २००५, २००६ या सालासह २०१०, २०११, २०१६, २०१७ तसेच २०२० व २०२१ या वर्षात पूर्ण संचय पातळी गाठली. मांजरा प्रकल्प १९९६, १९९८ यासह २०००, २००८ व गतवर्षी २०२० मध्ये ओव्हरफ्लो झाला होता. अशाप्रकारे यापूर्वी १४ वेळा पूर्ण पाणीसाठा झाला होता.
कळंब तालुक्यातील या गावात आनंदीआनंद...
कळंब शहरापासूनच बॅकवॉटर सुरू होतं. पुढे मांजरा बेल्टमधील बॅकवॉटरच्या कळंब, खडकी, लोहटा, लोहटा पश्चिम, कोथळा, हिंगणगाव, करंजकल्ला आदी तर लाभक्षेत्रातील दाभा, आवाड शिरपूरा, सौंदणा, लासरा, इस्थळ, वाकडी, ताडगाव, घारगाव, रांजणी आदी तालुक्यातील १७ गावच्या शेतीला मांजरा प्रकल्प वरदान ठरतो.