कळंब : सरकारच्या तिजोरीत कररूपाने भर घालणारा सुटाबुटातलाच असतो असे काही नाही. अगदी सामान्य, कष्टकरी माणूसही कळत- नकळत ‘टॅक्स’ भरत असतो; पण त्याला याची जाणीवच नसते, हे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.
विविध यंत्रणांच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत भर पडत असते. यात आयकर खात्याचा ‘इन्कम टॅक्स’ असो की उत्पादन शुल्क खात्याचा ‘एक्साइज टॅक्स’. याशिवाय, सेवा व खरेदीसंदर्भात ‘जीएसटी’ भरलला जातो. यात जसा उद्योग, नोकरी अन् व्यवसायातील कमावत्या लोकांचा सहभाग असतो, तसाच अगदी रिक्षा चालक ते कामगार यांचाही असतो. अगदी शेतकरीही यात मागे नसतो. फरक असतो तो फक्त ‘डायरेक्ट’ अन् ‘इनडायरेक्ट’ करदात्यांचा. अगदी मोबाइलमध्ये रिचार्ज केले तरी, शेतीला विद्युतपंप घेतला तरी, गाडीत पेट्रोल टाकलं तरी अन् हॉटेलात खाऊन एखादा पेग रिचवला तरी आपण अप्रत्यक्ष कररूपाने काही रक्कम सरकारी तिजोरीत टाकतो हे सामान्यांना लक्षात येत नाही. अप्रत्यक्ष कर भरणाऱ्या बहुतांश व्यक्तींना सरकारच्या तिजोरीत आपला वाटा आहे, याचीच जाणीव नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे.
आपण टॅक्स भरता का?
कामगार - नाही बाबा, आपली तेवढी कमाईच नसते.
भाजी विक्रेता - आम्हाला कसला डर, आमचा व्यवहारच असतो शेकड्यात लाँड्री
चालक - नाही, यासंदर्भात काही माहितीही नाही
फेरीवाला - पोटापाण्याचे भागविण्याचे पडलेले असते, टॅक्स कसला भरता?
सुरक्षा रक्षक - इन्कम टॅक्स भरत नसलो तरी जीएसटी भरतोच की
सफाई कामगार - टॅक्सबिक्स काही माहीत नाही, तेवढं उत्पन्नही नाही.
सलून चालक - कर भरण्याइतपत उत्पन्न नसल्याने आजवर कधी भरला नाही
चालक - आम्ही खरेदी करताना आता काही रक्कम शासनाला जातेच की
शेतकरी - विविध वस्तू घेताना आम्ही कर भरतोच की
गृहिणी - नाही. तेवढी आमची मिळकतच नसते. कसला टॅक्स भरायचा?
प्रत्येक जण टॅक्स भरतो?
कराचे दोन प्रकार असतात. एक डायरेक्ट कर अन् दुसरा इनडायरेक्ट कर. म्हणजेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे आपण थेट खिशातून सरकारला भरतो, जसा की इन्कम टॅक्स. अप्रत्यक्ष कर म्हणजे जीएसटी, एक्साईज वगैरे. वस्तूंची खरेदी करीत असताना किंवा सेवेवर देतो तो म्हणजे अप्रत्यक्ष कर जो की व्यापारी ग्राहकांकडून घेतो आणि सरकारी तिजोरीत जमा करतो. सामान्य लोक असोत की, कष्टकरी किंवा गरीब-श्रीमंत असो प्रत्येकाला अप्रत्यक्ष कर भरावा लागतोच. एकूणच कष्टकरी माणूस हा अप्रत्यक्षपणे कर हा भरतच असतो.
- दत्तात्रय टोणगे-पाटील, सीए, कळंब