काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या हाेत्या. परंतु, पाठाेपाठ दुसरी लाट येऊन धडकली. त्यामुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. दरम्यान, मध्यंतरी रुग्णसंख्या काहीअंशी ओसरल्यानंतर पुन्हा आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्येत वाढ हाेऊ लागले आहेत. एवढेच नाही तर वैद्यकीय तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा अंदाजही वर्तविला जात आहे. याच भीतीमुळे अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवित नाहीत. त्यामुळे आजघडीला ६४० पैकी २१९ शाळाच सुरू हाेऊ शकल्या. उर्वरित ४२१ शाळा कुलूपबंदच आहेत.
जिल्ह्यातील एकूण शाळा
६४०
सध्या सुरू असलेल्या शाळा
२१९
विद्यार्थ्यांची ३५ ते ४० टक्केच उपस्थिती
जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांची संख्या सुमारे ६४० एवढी आहे, तर विद्यार्थीसंख्या २० हजार १२५ च्या घरात आहे. परंतु, काेराेनाच्या भीतीने आजही अनेक विद्यार्थी शाळेत येणे टाळू लागले आहेत. परिणामी ४२१ शाळा कुलूपबंद ओहत. हे प्रमाण ३५ ते ४० टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. आजघडीला ८ हजार ९६४ विद्यार्थीच शाळेत जाऊन ज्ञानार्जन करीत आहेत.
काेणत्या तालुक्यातील किती शाळा सुरू?
तालुका एकूण शाळा सुरू असलेल्या शाळा विद्यार्थी उपस्थिती
उस्मानाबाद ११६ ३३ ९२३
तुळजापूर ११० ५७ २२६९
लाेहारा ३२ ०४ ११८
उमरगा १०२ ४७ २४४८
कळंब ८९ २९ १३५४
भूम ५६ १७ ६६०
परंडा ५३ २३ ८१५
वाशी ३७ ०९ ३३७
विद्यार्थी मजेत, पालक चिंतित...
काेराेनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आमची शाळा सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काळात माझे वडील शाळेत पाठवायला तयार नव्हते. मात्र, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या काळजीसंदर्भात गुरुजींनी वडिलांना माहिती दिली. तेव्हापासून मी नियमित शाळेत जात आहे. मागील काही दिवसांत वर्गातील विद्यार्थीसंख्याही वाढली आहे.
-संकेत गावडे, विद्यार्थी
आमच्या गावात एकही रुग्ण नाही. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच शाळा सुरू झाली आहे. मीही नियमित शाळेत जाताे. मास्क, सॅनिटायझर आदी काळजी शाळेकडून घेतली जाते. या उपाययाेजनांमुळेच शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढू लागली आहे.
-समाधान सूर्यवंशी, विद्यार्थी
आमच्या गावातील शाळा सुरू झाली हाेती. परंतु, काही दिवसांतच गावात लागाेपाठ तीन ते चार रुग्ण आढळून आले. त्यामुळे अनेक पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले. परिणामी आजघडीला शाळा बंद आहे. काेराेनाचा संसर्ग पूर्णपणे थांबल्याशिवाय शाळा सुरू न केलेल्याच बऱ्या.
-शंकर मदणे, पालक