तुळजापूर (जि. धाराशिव) : पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या डाेक्यात शॉक अब्सॉर्बरचा राॅड घालून खून केला. ही धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील सिंदफळ शिवारात घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध तुळजापूर ठाण्यात खुनाचा गुन्हा नाेंदविण्यात आला.
सिंदफळ येथील सत्तार यासीम ईनामदार (५५) हे बुधवारी सिंदफळ शिवारातील बार्शी रोडलगत असलेल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले हाेते. दिवस मावळतीला गेला असतानाही ते घरी परतले नव्हते. त्यामुळे मुलगा साेहेल हा त्यांना शाेधण्यासाठी शेतात गेला. याचवेळी शेतात वडील सत्तार इनामदार रक्ताच्या थाराेळ्यात पडल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून त्याने घाबरलेल्या अवस्थेत चुलत भाऊ वसीम इनामदार यास फाेन करून ‘‘भय्या तुम जल्दी आ जावो’’असे म्हणत टाेहाे फाेडला. काही क्षणातच वसीम शेतात दाखल झाला. या दाेघांनी मिळून रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या सत्तार इनामदार यांना तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रथमाेपचार करून डाॅक्टरांनी त्यांना साेलापूर येथे रेफर केले. मात्र, तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. वसीम इनामदार यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात सिंदफळ येथील गणेश घाटशिळे यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध कलम १०३ (१), ३ (५) भारतीय न्यायसंहिता २०२३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
दाेघा आराेपींना बेड्याडाेक्यात दुचाकीच्या शॉक अब्सॉर्बरचा राॅड घालून सत्तार इनामदार यांचा खून केल्यानंतर तिघे आराेपी फरार झाले. यानंतर पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दाेघा आराेपींना बेड्या ठाेकल्या. गणेश घाटशिळे यास तुळजापूर येथून तर कोल्हापूर येथून समाधान संपत शिंदे (रा. धारूर, ता. जि. धाराशिव) यास ताब्यात घेतले. तिसऱ्या आराेपीच्या मागावर पाेलिस आहेत. घटनास्थळावर दारूच्या बाटल्या तसेच दुचाकीच्या शॉक अब्सॉर्बरचा राॅडही आढळून आला. मात्र, मयताची दुचाकी आणि माेबाइल गायब हाेता.