जेवळी : तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी (नळ) येथील काही शेतकऱ्यांनी शेतरस्ता अडविल्याने इतर शेतकऱ्यांना शेतीला जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत वैतागलेल्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सामंजस्यपणाची भूमिका घेत, शेतरस्ता खुला करण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जळकोटवाडी (नळ) येथील शेतकऱ्यांनी शेतरस्ता अडवणूकप्रकरणी तुळजापूर तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती. तहसीलदारांनी जळकोट येथील मंडळ अधिकारी यांना लेखी आदेश दिल्यानंतर, मंडळ अधिकारी यांनी तलाठी यांच्यासह गावातील पंचांच्या सहकार्याने या शेतरस्त्याची पाहणी केली. यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सर्व संबंधित शेतकऱ्यांच्या संमतीनुसार शेतरस्ता तयार केला. असे असतानाही काही मोजक्या शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवून ठेवला असल्याने, शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून सामंजस्यपणाने हा शेतरस्ता आता खुला करण्यात आला आहे.
यावेळी जळकोटचे मंडळ अधिकारी पी.एस. भोकरे, तलाठी तात्यासाहेब रूपनवर, कर्मचारी अशोक दूधभाते, सरपंच शिवाजी कदम, पोलीस पाटील देविदास वागदरे, शिवाजी वागदरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी या रस्त्यावरील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.