कळंब : तालुक्यातील मांजरा नदीच्या तीरावर वसलेल्या गावात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेती अन् शेतकरी संकटात आहे. याठिकाणी भेट देत आ. कैलास पाटील यांनी ‘घाबरू नका, सरकार आपल्या पाठीशी आहे’, असे म्हणत शेतकऱ्यांना धीर दिला.
बहुला येथून मांजरा नदी तालुक्यात प्रवेशित होते. या नदीच्या तीरावर पुढे आढळा, खोंदला, सात्रा, भाटसांगवी, कळंब, आथर्डी आदी गावांचा शिवार येतो. मागच्या पाच दिवसांपासून मांजरा नदीला पूर आलेला आहे. यामुळे उपरोक्त गावातील नदीकाठचे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके मांजराच्या पाण्याने आपल्या कवेत घेतले आहेत. इतर शिवारातही पाणीच पाणी झाले आहे. उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.
दरम्यान, आ. कैलास पाटील यांनी रविवारी तालुक्यातील बहुला, आढळा, सात्रा, खोंदला, आडसूळवाडी, भाटसांगवी आदी मांजरा पट्ट्यातील गावांना भेटी देत पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांची उपस्थिती होती. यावेळी ‘धीर सोडू नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. पंचनामा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. विम्याचा वैयक्तिक क्लेम सादर करावा’, असे सांगत आ. पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.