गुणवंत जाधवर
उमरगा : बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. परंतु, चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. चीनमध्ये मिळणारे व भारतात मिळणारे चायनिज पदार्थ यात खूप फरक आहे. रस्त्याशेजारी, फुटपाथवर, गल्लोगल्ली मिळणारे चायनिज पदार्थ सहज आणि स्वस्तात उपलब्ध होत असल्यामुळे तेच खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टच्या तुलनेत हे पदार्थ स्वस्तात द्यायचे, तर त्यांचे ‘कुक’ अनेक तडजोडी करतात. यात आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वापरल्या जाणारा अजिनोमोटो पचनसंस्थेसह शरीराचे इतरही नुकसान करू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चायनिज पदार्थामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यासारखे पदार्थ वापरल्यामुळे पचनशक्तीवर ताण येऊन ती बिघडू शकते. भात, बांबूचे मूळ, मशरुम्स, नूडल्स हे चिनी लोकांचे ‘स्टेपल फूड’ आहे, तसे ते आपले नाही. नूडल्स, चिकन किंवा मांस अर्धकच्चे शिजवले गेले तर पचायला हानीकारक असतात. शिवाय मैदा आतडय़ात जाऊन चिकटत असल्यामुळे त्याचा अतिरेकी वापर घातक आहे. ‘रोडसाइड चायनिज फूड’मध्ये वापरला जाणारा तांदूळही पॉलिश्ड किंवा रिफाइंड असल्याने पचनसंस्थेसाठी हितकर नसतो. फक्त भाज्या अर्धकच्च्या शिजवल्या तरी त्यांचा काही त्रास होण्यासारखा नाही. एखाद्या वेळी चायनिज पदार्थ खाण्याने काही बिघडत नाही; परंतु आठवडय़ातून तीन-चार वेळा चायनिज पदार्थ खाण्याची सवय हानीकारक ठरू शकते. या पदार्थामध्ये होणारा स्वस्त कच्च्या मालाचा व कृत्रिम रंगांचा वापर, सॉसेसचा व ‘प्रिझव्र्हेटिव्हज्’चा सढळ वापर, भरपूर तेल वापरले जात असल्यामुळे जास्त प्रमाणात मिळणाऱ्या कॅलरीज हे सर्व शरीरासाठी घातक आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
काय आहे अजिनोमोटो?
चायनिज पदार्थाना चव अजिनोमोटो (मोनोसोडियम ग्लुटामेट) हा पदार्थ आहे. याच्या अतिरिक्त वापरामुळे या पदार्थाचे सेवन आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते, असे आढळून आले आहे. ‘अजिनोमोटो’ नावाची कंपनी तयार करीत असलेल्या ‘फ्लेव्हर एन्हान्सर’चे शास्त्रीय नाव ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’ असून, त्यात सोडियम, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये असतात. व्हिनेगरप्रमाणेच अजिनोमोटोही आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार होते. अनेक भाज्या, सॉसेस, सूप, मांस, मासे, अंडी यामध्ये अजिनोमोटो चांगल्या रीतीने मिसळू शकतो, पण तो जास्त वापरला गेला, तर मात्र पदार्थाची चवच बिघडते, तसेच खाणाऱ्याचे आरोग्यही बिघडू शकते.
...म्हणून चायनिज खाणे टाळा
मोनोसोडियम ग्लुटामेटचा सर्रास वापर शरीराचे सगळ्यात जास्त नुकसान करणारा आहे. ते अधिक प्रमाणात वापरले गेल्यास जादा सोडियमवर प्रक्रिया करायला आतडय़ांना वेळ लागतो आणि टाकाऊ पदार्थ मूत्रपिंडांमार्फतच बाहेर टाकले जात असल्यामुळे मूत्रपिंडांच्या कार्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो. यामुळेच ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अजिनोमोटोचा वापर झालेले पदार्थ खाऊ घालणे अतिशय धोकादायक आहे. आठवडय़ातून तीन-चार वेळा चायनिज पदार्थ खाण्याची सवय हानीकारक ठरू शकते.
डॉक्टर म्हणतात...
अजिनोमोटो म्हणजेच मोनोसोडीयम ग्लुटामेट हा एक खाद्य पदार्थांचा स्वाद वाढवणारा घटक आहे. वेगवेगळे फ्राइड राइस, नूडल्स व इतर चायनीज पदार्थामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. माजिनोमोटोचा सर्वप्रथम शोध जपानमध्ये लागला. त्याचे अतिसेवन केल्यास ते शरीराला अत्यंत घातक असते. यामुळे गंभीर आजारांना सामोरे जावे लागले. त्यासाठी अश्या पदार्थ सेवनाचा अतिरेक टाळला पाहिजे.
- डॉ मृणालिनी बुटूकने, उमरगा