तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर पुन्हा उघडेपर्यंत मंदिर संस्थानतर्फे शहरातील पुजारी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे, शहरातील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये पिढ्यानपिढ्या पुजारी व्यवसाय करणाऱ्या पुजारी समाजावर आज मंदिर बंद झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. तुळजापूर शहरामध्ये बाहेरगावाहून व इतर राज्यातून येणाऱ्या देवी भक्तांची सेवा, देवीची पूजा करणे, त्यांच्या राहण्याची, जेवण्याची सोय करणे, अशी सेवा वर्षानुवर्ष पुजारी करीत आलेले आहेत. यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, मागील वर्षी व चालू वर्षी प्रशासनाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंदचे आदेश दिले आहेत. परिणामी मंदिरावर उपजीविका अवलंबून असलेल्या पुजारी कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच पुजारी व्यवसाय करणाऱ्यांना दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे या गरजू कुटुंबांना मदतीचा हात म्हणून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत मंदिर सुरळीत चालू होईपर्यंत दरमहा जीवनावश्यक वस्तूंचे किट (किराणा माल) देऊन मदत करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी विवेक शिंदे, पुजारी अजय खुंटाफळे, वल्लभ घांडगे, सचिन गडदे, नागनाथ स्वामी व पुजारी उपस्थित होते.