धाराशिव : शरीरसंबंध ठेवण्यासाठी गावातीलच एका व्यक्तीकडून छळ होत असल्याने आणि जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने याला वैतागून उमरगा तालुक्यातील कसगीवाडी येथील मंजूषा केशव माशाळे (वय २८) या तरुणीने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली आहे. ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली असून, मयत तरुणीच्या पित्याने २० ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीवर उमरगा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
गावातीलच आरोपी अर्जुन शिवराम लवटे हा मंजूषाला सातत्याने शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करीत होता. यासाठी तो सातत्याने तिला त्रास देत होता. तसेच दाखल केलेला गुन्हा मागे घे, म्हणूनही आरोपी धमकावत होता. मात्र, मंजूषा त्याच्या धमक्यांना भीक घालत नव्हती. त्यामुळे आरोपीने गुन्ह्यातून माघार घेण्यासाठी व शरीरसंबंध ठेवण्यास राजी नाही झाल्यास जिवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. त्याच्या या त्रासाला वैतागून मंजूषा हिने ४ ऑगस्टच्या रात्री गावातीलच रावसाहेब लवटे यांच्या शेतातील विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली, अशी तक्रार तिचे वडील केशव माशाळे यांनी २० ऑगस्ट रोजी उमरगा पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.