उस्मानाबाद : राज्यातील पाच जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समिती पोट निवडनुका आगामी काळात होत असून, यासाठी होणाऱ्या जनगणनेमध्ये राष्ट्रीय ओबीसी संवर्गाची जातीनिहाय जनगणना करावी, यासह अन्य मागण्यांबाबत ओबीसी महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. अशोक जीवतोडे, सचिन राजूरकर, सुभाष घाटे, राजकुमार घुले, संदीप चिलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आदींना हे निवेदन पाठविण्यात आले. यात भारतीय संविधानाच्या कलम २४३ (डी -६) आणि कलम २४३ (टी -६) सुधारणा (अमेंडमेंट) करून ओबीसी संवर्गात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायतीत ओबीसी संवर्गाला २७ टक्के राजकीय आरक्षण राहील, अशी तरतूद करावी, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले, नितीन शेरखाने, लक्ष्मण माने, वैजिनाथ गुळवे, किरण बहिरे, तालुकाध्यक्ष अजित चव्हाण, पांडुरंग लाटे, चंद्रकांत धुर्वे, अजय यादव, संजय काळे आदी उपस्थित होते.