लोहारा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक ठिकाणी दिग्गज पुढाऱ्यांना मतदारांनी पराभवाचा धक्का दिला आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कानेगाव, भातागळी, सय्यद हिप्परगा, एकोंडी लो, कास्ती (खु) ग्रामपंचायतमध्ये सत्तापरिवर्तन तर आष्टाकासार, बेलवाडी, हराळी, करजगाव येथे सत्ता कायम राखण्यात नेतेमंडळींना यश आले.
तालुक्यातील आरणी, तावशीगड, धानुरी, राजेगाव व मार्डी या पाच ग्रामपंचाती बिनविरोध निघाल्या असून, उर्वरित २१ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक प्रक्रियापार पडली. कानेगाव ग्रामपंचायतीवर दहा वर्षे सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसच्या गटाला युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे यांनी आव्हान देत सर्वच जागा ताब्यात घेतल्या. भातागळी ग्रामपंचायवर साई प्रतिष्ठान पॅनलची दहा वर्षांची सत्ता उलथून टाकत सच प्रतिष्ठान पुरस्कृत शंभो महादेव पॅनलने ११ पैकी सात जागेवर विजय मिळविला. कास्ती (खुर्द) ग्रामपंचायतवर विद्यमान उपसरपंच महेश पाटील यांच्या दहा वर्षांच्या सत्तेला धक्का देत महाविकास आघाडी पॅनलचे सागर पाटील यांनी सर्वच सात जागा ताब्यात घेतल्या असून, येथे जीसीबीने गुलालाची उधळण करीत विजयी जल्लोश साजरा करण्यात आला. सय्यद हिप्परगा ग्रामपंचायतवर काँग्रेसचे असलेल्या वर्चस्वाला धक्का देत आजमेर कारभारी सात पैकी पाच जागा जिंकून सत्ता ताब्यात घेतली आहे. एकोडी (लो) ग्रामपंचायतवर दहा वर्षे सत्तेत विद्यामान उपसरपंच महेश पाटील यांनाही पायउतार व्हावे लागले असून, ईश्वर ढव पॅनलने ७ पैकी ६ जागा जिंकत ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. आष्टा कासार येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विद्यमान सरपंच सुनील सुलतानपुरे व महादेव पाटील ग्रामविकास पॅनलला गेले पाच वर्षे केलेल्या विकासकामाच्या जोरावर मतदारांनी पुन्हा सत्ता सोपवली आहे. करजगाव ग्रामपंचायत पुन्हा सत्ताधारी गटाच्या ताब्यात आली असून, मुर्शदपूरमध्ये ही मतदारांनी सत्ताधाऱ्याच्या बाजूने कौल दिला आहे. कास्ती (बु.) येथे युवा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख परवेज तांबोळी यांनी सर्वच जागावर विजय मिळवत तरुणाचा झेंडा रोवला आहे.
हराळी येथे नवतरुण पॅनेला मतदारानी पसंदी देत तरुणानाच्या हाती सत्ता दिली आहे. मोघा येथे ही मतदारानी युवकाना पसंती देत सचिन गोरे यांच्याकडे ग्रामपंचायतचा कारभार सोपविला आहे. लोहारा खुर्द येथील नऊ पैकी ३ बिनविरोध निघाल्या होत्या. त्यामुळे ६ जागासाठी निवडणूक झाली. यात बिनविरोध पॅनलचे ५ विजयी, तर विरोधी गटाला एका जागेवर समाधान मांनावे लागले. होळी ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण आठ जागांसाठी मतमोजणी पार पडली. निवडणुकीच्या रिंगणात दोन पॅनलच्या वतीने सोळा व एक अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब अजमावले. यापैकी परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे आठ पैकी पाच, तर माझे गाव ग्रामविकास पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांमध्ये केशव सरवदे व बबिता मडुळे या दोन विद्यमान सदस्यांचा समावेश आहे. कोंडजीगडमध्ये ९ पैकी ७ जागा बिनविरोध आल्याने दोन जागेसाठी झालेल्या निवडणुकीत माजी सरपंच शाहुराज नेलवाडे गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. दस्तापूर ग्रामपंचायतवर जगन्नाथ पाटील गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. भोसगा ग्रामपंचायतवर बळीराजा ग्रामविकास पॅनलने सर्वच जागा जिकत सत्ता स्थापन केली असून, बेलवाडी ग्रामपंचायतवर दादा पाटील गटाकडे पुन्हा एकदा मतदारांनी विश्वास ठेवत सत्ता सोपावली आहे.
तालुक्यातील करवंजी ग्रामपंचायतमध्ये सत्तातर झाले असून, काशीनाथ देवकर यांच्या तुळजाभवी पॅनलने ७ पैकी ५ जागेवर विजयी होत सत्ता ताब्यात घेतली, तर जय हनुमान पॅनेलच्या दोन जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत.
यांना मिळाली समसमान मते
एकोडी (लो) येथील ओबीसीच्या आरक्षित असलेल्या एका जागेसाठी दिनकर लाळे व राजेंद्र घोडके यांना प्रत्येकी ५७ मते पडली. यामुळे येथे लहान मुलीच्या हाताने चिठ्ठी काढून विजयी उमेदवार जाहीर करण्यात आला. यामध्ये यात दिनकर लाळे विजयी झाले.
चिचोली काटे येथे प्रभाग एकमध्ये शिवाजी करदोरे व विशाल पाटीस यांना प्रत्येकी १०८ मते मिळाली. यामुळे येथेही यात काढण्यात आली. यातून शिवाजी करदोरे विजयी झाले. येथील प्रभाग २ मध्ये सार्वसाधारण महिलांमध्ये सगुना करदोरे व दीपा करदोरे यांनी प्रत्येकी १११ मते पडली. यात सगुना करदोरे यांना चिठ्ठी काढून विजयी घोषित करण्यात आले आहे.