परंडा : शेतकऱ्यांच्या पीक विमा कापणी प्रयोगाच्या पहिल्या टप्प्याला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. तालुक्यातील ५ महसूल मंडळांच्या माध्यमातून २९ गावांमध्ये हे पीक कापणी प्रयोग घेतले जाणार आहेत.
महसूल विभागातर्फे जाहीर होणाऱ्या पैसेवारी व आधारित पीकविमा देण्याची पद्धत बंद झाली आहे. यासाठी आता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास, उत्पन्न न आल्यास, बियाणे न उगवल्यास महसूल, कृषी व जिल्हा परिषद विभागातर्फे संयुक्त समिती नेमून पीक कापणी प्रयोग घेतले जाणार आहेत. अनेक शेतकऱ्यांना कमी पावसाने उत्पन्न येत नाही, तरी त्यांना पीक विमा मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. मात्र, शासनाने त्यासाठी रॅन्डम पद्धतीने गावांची निवड केली आहे. पहिल्या टप्प्याला १ ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात समितीने ज्या पिकांचे प्रयोग ज्या गावाला घ्यायचे आहेत, त्या ठिकाणी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी करून त्यातील दोन शेतकऱ्यांची निवड करून ठेवायची आहे.
चौकट....
या गावांचा समावेश
तालुक्यात परंडा, आसू, जवळा, अनाळा आणि सोनारी अशी पाच मंडळे आहेत. यातील आवारपिंपरी, पाचपिंपळा, खासापुरी, पिठापुरी, शिराळा, कात्राबाद, देवगाव (खु.), आसू, दहिटणा, आंदोरा, येणेगाव, भांडगाव, रोहकल, पिस्तमवाडी, चिंचपूर (बु), पांढरेवाडी, ताकमोडवाडी, जेकटेवाडी, तांदुळवाडी, कोकरवाडी, कंडारी, कार्ला, कौडगाव, कपिलापुरी, वाघेगव्हाण, सावरवाडी, देवगाव बुद्रुक, रत्नापूर, गोसावीवाडी (डोंजा) या गावांत हे पीक कापणी प्रयोग होणार आहेत.
कोट......
पीकविमा पारदर्शी पद्धतीने मिळावा, यासाठी समिती आणि शेतकरी निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सरपंच, पोलीसपाटील व शेतकरी यांनी दक्ष राहून योग्य माहिती भरली जाईल, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांनी पीक कापणी प्रयोगाला प्रतिसाद देऊन महसूल, पंचायत समिती, कृषी विभाग अशा तिन्ही यंत्रणेला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे.
- डॉ. तानाजीराव सावंत, आमदार
कोट....
पीक कापणी प्रयोगाची कापणी, मळणी ग्रामस्तरीय समितीसमोर करावी. समितीच्या सर्व सदस्यांनी कापणी व मळणीला हजर राहावे. ज्या शेतकऱ्यांची निवड केलेली आहे, त्यांनी काढणी करण्याअगोदर संबंधित कर्मचाऱ्यांना कल्पना द्यावी. परस्पर प्लॉटची काढणी करू नये. महसूल व कृषी विभाग शेतकऱ्यांच्या समक्ष प्रयोग करून अहवाल पाठवतील.
- एम. आर. मोरे, तालुका कृषी अधिकारी.