उमरगा : सर्वत्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असला तरी जुलै महिन्यापासून सर्दी-खोकला, डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना साधा ताप जरी आला तरी याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.
सध्या गावागावांत सर्दी-खोकला, डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण वाढत असून, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमुळे शासकीय तसेच खाजगी रुग्णालयेदेखील फुल्ल दिसत आहेत. यात विशेषत: लहान मुलांची संख्या अधिक आहे. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची लक्षणे कोणती असतील, याबाबत निश्चित माहिती नाही. डॉक्टरांच्या मते सर्दी-खोकल्याने रोज सुमारे ३० तर डेंग्यू-मलेरियाची लक्षणे घेऊन सुमारे ५ टक्के रुग्ण येत आहेत.
कोरोनाचे एकूण रुग्ण - ६,३५०
१५ वर्षांखालील रुग्ण - २९९
ताप आला म्हणजे कोरोना असे नाही, पण....
पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी अशी लक्षणे बहुसंख्य रुग्णांमध्ये आढळून येतात. त्यामुळे ही लक्षणे दिसल्याने कोरोना झाला असे समजू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आपल्या परिसरात व घरात सांडपाणी जमा हाेत असेल तर डेंग्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाची भीती दूर ठेवून डेंग्यू होणार नाही, याची काळजी घ्यावी.
आतापर्यंत तालुक्यात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एकाही लहान मुलाला काेरोना आढळून आलेला नाही. मात्र, डेंग्यूवर उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
सर्दी, खोकला, तापाची साथ-
सर्दी, खोकला, अंगदुखीचे सर्वाधिक रुग्ण तालुक्यात आढळून येत आहेत. यात सर्दी-खोकल्याचे रुग्ण २५ ते ३० टक्के तर डेंग्यू-मलेरियाने बाधित साधारणत: ४ ते ५ टक्के रुग्ण असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
बालकांसाठी कोविड केअर सेंटर
उमरगा शहरात डॉ. प्रशांत मोरे, डॉ. विनोद जाधव, डॉ. एन. डी. बिराजदार या तीन खाजगी रुग्णालयांत बालरुग्ण कोविड रुग्णालयाचे प्रस्ताव पाठविले आहेत. उमरगा उपजिल्हा रुग्णालयात १० बेड बालकांसाठी तयार आहेत.
घाबरू नका, काळजी घ्या!
सध्या संभाव्य कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने बालकांची काळजी घेणे गरजेचे आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, साबण किंवा सॅनिटायझरचा वापर आवश्यक आहे. ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब, अशक्तपणा, अंगावर लाल रॅश आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरात कोणीही कोरोना पॉझिटिव्ह असल्यास इतर सर्वांनी कोरोनाची तपासणी करून घ्यावी.
- डॉ. प्रशांत मोरे, बालरोग तज्ज्ञ. उमरगा