कळंब : शहरातील परळी, येरमाळा, ढोकी रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नगरपालिकेने मोकाट जनावरे तातडीने जप्त करावीत, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी केली आहे.
शहरातील रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढून वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. मोकाट जनावरांमध्ये गाय, वासरांचा समावेश आहे. ही जनावरे रस्त्याच्या मधोमध व अस्ताव्यस्त बसतात. वाहनचालकाने हॉर्न वाजवला तरी ही जनावरे हालत नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, बाजू घेताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
मोकाट जनावरांचा सर्वाधिक त्रास ढोकी व येरमाळा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. बैलपोळा सणापासून मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. शहरात वाहनाचा प्रवेश होत असताना वेगमर्यादा असणे आवश्यक आहे. परंतु त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यातच रस्त्यावर ठाण मांडून असलेल्या मोकाट जनावराची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना रस्त्यावर बसलेल्या मोकाट जनावरांमुळे गाडी चालविताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गाडी चालविताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटले किंवा ब्रेक लागले नाही तर जीवितहानी टाळता येऊ शकत नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देऊन रस्त्यावर ठाण मांडून बसणारी मोकाट जनावरे जप्त करावीत, अशी मागणी कापसे यांनी केली आहे.