तामलवाडी : गावाच्या शेजारची गावे कोरोनाने त्रस्त होती. अनेक रुग्णांचा बळी जात होता. असे असताना तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी गावाने मात्र पहिल्या लाटेत रुग्ण आढळून येताच कडक उपाययोजना राबवून कोरोनाला गावाबाहेर हाकलले. यानंतर याच उपाययोजना कायम ठेवत दुसऱ्या लाटेतही अद्यापपर्यंत कोरोना विषाणूला गावात एन्ट्री मिळू न देण्यात गावाला यश आले आहे.
तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी हे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेस तीन किमी अंतरावरील दीड हजार लोकवस्तीचे गाव. येथील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह शेती, पशुपालन आणि मजुरीवर भागतो. गोंधळवाडी हागणदारीमुक्त गाव म्हणून ओळखले जाते. या गावात कोरोनाच्या पहिल्या लाटेत जुलै महिन्यात वीस जणांना कोरोनाची बाधा झाली. यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेत संसर्ग रोखण्यासाठी गावपातळीवर कडक उपाययोजना आखल्या. गावाला जोडणाऱ्या सीमा तत्काळ बंद केल्या. गावकऱ्यांना रोगप्रतिकारक गोळ्या वाटल्या. यामुळे अवघ्या महिनाभरात कोरोनाची साखळी तोडण्यात गावाला यश आले.
यानंतर साधारण मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. या लाटेची तीव्रता अधिक होती. परंतु, या ग्राम पंचायतीने पहिल्या लाटेत सुरू केलेल्या फवारणी, मास्क-सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग तसेच गावातच संशयितांची रॅपिड अँटिजन टेस्ट आदी उपाययोजना मागील अकरा महिन्यांपासून कायम सुरूच होत्या. त्यामुळे दुसऱ्या लाटेत या गावात अद्यापपर्यंत एकही कोरोनाबाधित आढळून आला नसल्याने हे गाव चिंतामुक्त राहिले. यासाठी सरपंच राजाभाऊ मोटे, उपसरपंच गोपाळ मोटे, तलाठी हनमंत कुदळे, ग्रामसेविका भाग्यश्री देवकते, माजी सरपंच लक्ष्मी मोटे, आशा कार्यकर्ती संगीता मोटे, अंगणवाडी कार्यकर्ती सुमित्रा माने, अश्विनी दुधाळ, मदतनीस लतिका माशाळ, माया मोटे, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका जयमाला वटणे, शंकर राऊत, आरोग्य सेवक अरविंद भालेकर आदी परिश्रम घेत आहेत.
चौकट
वर्षभरापासून गोंधळवाडी गावात कडक उपाययोजना सुरूच आहेत. प्रत्येक १५ दिवसाला फवारणीवर भर दिला जात असून, नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटण्यात आल्या. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे दुसऱ्या लाटेत अद्यापपर्यंत गाव कोरोनामुक्त राहू शकले.
- राजाभाऊ मोटे,
सरपंच
गतवर्षी गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर गावकऱ्यांना विश्वासात घेऊन नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले होते. ग्रामस्थांनी देखील यास चांगली साथ दिली. त्यामुळे या लाटेत गावाला मोठा दिलासा मिळाला.
- भाग्यश्री देवकते,
ग्रामसेविका
चौकट
मागील वर्षभरापासून प्रत्येक महिन्याला गावातील कुटुंबनिहाय तापमान व ऑक्सिजनची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. हे काम दोन अंगणवाड्यांमधील कार्यकर्ती, मदतनीस यांच्या सहभागाने पूर्ण करीत आहोत.
- सुमित्रा माने,
अंगणवाडी कार्यकर्ती