सोनारी : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, आदी राज्यांतील असंख्य भाविकांचे कुलदैवत असलेले परंडा तालुक्यातील श्री श्रेत्र सोनारी येथील सिद्धनाथ म्हणजेच श्री काळभैरवनाथ मंदिर सध्या असुविधांच्या विळख्यात सापडले आहे. मंदिराच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे भाविकांच्या, तसेच त्या परिसरातील नागरिकांच्या, तर दूषित पाण्यामुळे येथे असणाऱ्या माकडांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंदिर परिसरात सोनुबाई, काशीबाई व नागझरी असे तीन तीर्थकुंड आहेत. या तिन्ही तीर्थकुंडामधील पाणी दूषित झाले असून, काशीबाई व नागझरी तीर्थकुंडातील पाण्यावर अक्षरश: शेवाळाचा थर साचल्याचे दिसत आहे. या कुंडातील दूषित पाणी पिल्यामुळे माकडांना साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंदिर बंद असताना देखील भाविक दर्शनासाठी येत असून, तीर्थ म्हणून ते या कुंडातील पाणी पितात. यामुळे भाविकांच्या आरोग्याचादेखील प्रश्न निर्माण झाला आहे.
सोनारी येथील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे जवळपास दोन ते तीन हजार माकडे असून, ती सर्व माणसाळलेली आहेत. ही माकडे भैरवनाथाची वानर सेना असल्याचे मानले जाते. यापूर्वी २०१२-१३ मध्ये अज्ञात रोगामुळे २०० ते ३०० माकडांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर २०२० मध्येदेखील मंदिर परिसरातील तीर्थ कुंडातील दूषित पाण्यामुळे १०० ते १५० माकडांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा माकडांच्या मृत्यूची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
मंदिर परिसरातील अस्वच्छतेबाबत व तीर्थ कुंडातील दूषित पाण्यासंदर्भात भैरवनाथ देवस्थानचे पुजारी समीर पुजारी यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच मंदिर परिसर स्वच्छ करून तीर्थ कुंडातील शेवाळ काढून ब्लिचिंग पावडर टाकण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
चौकट....
सूचना बेदखल
२०२० मध्ये परंडा येथील उपविभागीय प्रयोगशाळेने मंदिर परिसरातील तिन्ही कुंडातील पाणी दूषित असल्याचा अहवाल दिला होता. तसेच माकडांच्या उपचारांसाठी आलेल्या पशुवैद्यकाच्या पथकाकडून श्री काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टला माकडांच्या मृत्यूबाबत प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी एक पत्र देण्यात आले होते. यात माकडांना स्वच्छ पाणी व आहार पुरविण्यात यावा, मंदिर परिसरातील तिन्ही कुंडातील पाणी पूर्णपणे स्वच्छ करावे, त्या तिन्ही कुंडांत पाण्याचे टब ठेवून त्यात स्वच्छ पाणी ठेवावे, विषाणू व जीवाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करावा, मंदिर परिसरातील व अवतीभवतीचा परिसर निर्जंतुकीकरण करून स्वच्छता ठेवण्यासंदर्भात कळविले होते. मात्र, ट्रस्टकडून याबाबत कार्यवाही झाली नसल्याचे सद्य:स्थितीवरून दिसून येत आहे.