तामलवाडी (जि. उस्मानाबाद) -साेलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी (काटी) झोपडपट्टी भागातील भूमिगत जुनाट टाकीवर खेळताना चार वर्षीय मुलगा अचानक पडला. आजुबाजुच्या लाेकांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून मुलास सुखरूप पाण्याबाहेर काढले.
चार वर्षापूर्वी सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण झाले आहे. हे काम करताना रस्त्यालगतची रहिवासी घरे पाडण्यात आली हाेती. याच रस्त्यालगत ग्रामपंचायतीची वापरात नसलेली दगडी भूमिगत टाकी आहे. या टाकीच्या सभाेवताली घरे आहेत. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता टाकीलगत राहणारा चार वर्षाचा कृष्णा संतोष सुरवसे हा मुलगा खेळत टाकीवर पाेहाेचला हाेता. खेळत असतानाच ताे अचानक टाकीत पडला. यानंतर मुलगा माेठ्याने ओरडू लागला असता, आवाज ऐकून आजुबाजुचे लाेक टाकीचे दिशेने धावले. शंकर मगर दस्तगीर शेख, भारत सुरवसे, अमर मगर, पैगंबर शेख, संताेष सुरवसे आदीनी टाकीत दाेर टाकून त्यास बाहेर काढले. यानंतर बालकांच्या नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
चाैकट...
भूसंपादनात टाकीची नाेंदच नाही...
राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण कामाच्या वेळी भूसंपादन अधिकाऱ्यांनी वापराविना असणाऱ्या पाण्याच्या टाकी शेजाराची घरे पाडून जागा ताब्यात घेतली. त्यांना मावेजा दिला, मात्र पाण्याच्या टाकीची नोंद अंतिम निवाड्यात घेतली नाही. या संदर्भात ग्राम पंचायतने भूसंपादन व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक कार्यालयाशी पत्रव्यावहार केला आहे. त्याची दखल अद्याप घेतली नाही.
-ललिता मगर, सरपंच, सांगवी (काटी).