उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील विजाेरा येथे अंगणात झाेपलेल्या दाेघांना अज्ञात पाचजणांनी काेयता, कुऱ्हाड व काठीचा धाक दाखवून दाेन माेबाईलसह राेख २५ हजार रुपये लुटल्याची घटना दि. २१ ते २२ मे या कालावधीत घडली हाेती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या ३६ तासांत चारजणांना बेड्या ठाेकल्या. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमालही जप्त केला.
विजाेरा येथील निखिल भैरट व भिवा भैरट हे दाेघे आपल्या घरासमाेरील अंगणामध्ये झाेपले हाेते. याचवेळी अनाेळखी पाच व्यक्तींनी काेयता, कुऱ्हाड, काठीचा धाक दाखवून दाेघांकडील दाेन माेबाईल तसेच राेख २५ हजार रुपये घेऊन पाेबारा केला. यानंतर गावकरी आप्पा कदम यांच्या घरात घुसून भ्रमणध्वनी लंपास केला. या प्रकरणी वाशी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गाेपनीय माहितीच्या आधारे अनुज गणेश भाेसले (रा. डाेकेवाडी), सुबराव रंगा शिंदे (रा. पिंपळगाव), वैभव एकनाथ शिंदे (रा. फकराबाद), ज्ञानेश्वर लिंगा काळे (रा. पांढरेवाडी) या चाैघांना अटक करण्यात आली. २२ मे राेजी वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्याकडून दराेड्यात लुटण्यात आलेला मुद्देमाल तसेच दाेन दुचाकी जप्त करण्यात आल्या. यासाेबतच अन्य घरफाेड्यांत चाेरीस गेलेली रक्कमही जप्त करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास वाशी पाेलीस करीत आहेत.