वाशी : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाच्या व्यवस्थेमध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व त्याखालील नियमानुसार हे संचालक मंडळ निष्प्रभावित करण्यात आले असून, प्रशासक म्हणून राहुल गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे़
वाशी येथील ही सोसायटी १३ सदस्यीय व सर्वपक्षीय होती़ या संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत तीन महिन्यानंतर संपणार आहे़ सोसायटीचे चेअरमन नानासाहेब मोहनराव कवडे व काही सदस्यामध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे छगनराव मोळवणे, लक्ष्मणराव परंडकर, वैजिनाथ माळी, संतोष उंदरे, रमेश नन्नवरे, विमल उंदरे व सुमन जगताप यांनी राजीनामे दिल्याने संचालक मंडळ अल्पमतामध्ये येऊन व्यवस्थेमध्ये पोकळी निर्माण झाली होती़ सात संदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर अल्पमतात असलेले संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी राजीनामे दिलेल्या सदस्यांनी जिल्हा निबंधकाकडे केली होती. जिल्हा निबंधक यांच्या आदेशानुसार २१ सप्टेंबर रोजी वाशीचे सहाय्यक निबंधक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व त्याखालील नियमानुसार विद्यमान संचालक मंडळ निष्प्रभावित करत प्रशासक म्हणून राहुल गुरव यांची नियुक्ती करून घेतली आहे़