उन्मेष पाटील
कळंब : पालिका निवडणुकीत वाॅर्ड की प्रभाग या वादात राज्य सरकारने प्रभागाला कौल दिल्याने आगामी न. प. निवडणुकीच्या तयारीला आता सर्वच पक्षातील घडामोडींनी वेग घेतला आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण अंतिम झाल्यानंतर उमेदवारांच्या नावावरही शिक्कामोर्तब केले जाणार आहे. तूर्तास भावी नगरसेवकांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.
कळंब पालिका नेहमीच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहिली आहे. या पालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी सर्व प्रमुख पक्षात रस्सीखेच असते. मागील पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली होती. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्यापुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान असणार आहे. शहरात मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या तुलनेत अपक्ष उमेदवाराने लक्षणीय मते घेतल्याने शहरवासीयांना चांगला पर्याय दिला तर ते वेगळा निकाल देऊ शकतात, या शक्यतेने भाजपच्या आशा वाढल्या आहेत. पालिका निवडणुकीत सध्या सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना पदे देणे, बैठका घेणे, संभाव्य प्रभाग रचना व आरक्षण लक्षात घेऊन उमेदवारांची चाचपणी करणे आदींवर हे प्रमुख पक्ष सध्या लक्ष देत आहेत. इतर पक्षांतील काही मंडळी आपल्याकडे खेचण्यासाठीही आता या पक्षात स्पर्धा सुरू आहे. काहींना कामाचे आश्वासन तर काहींना उमेदवारीचे लॉलीपॉप दाखविले जात आहे. पुढील काही दिवसांत हे प्रकार आणखी वाढतील, असे चित्र आहे.
पालिका निवडणुकीत शहरात महाविकास आघाडीचा प्रयोग होईल, असे चित्र सध्यातरी नाही. शिवसेना व राष्ट्रवादी आता विरोधक व सत्ताधारी अशा भूमिकेत आहेत. पालिकेतील काही विकास कामांना सेनेने विरोध केला होता. ती प्रकरणे मुंबईपर्यंत गेली होती. त्यामुळे सेनेला सोबत नकोच, अशी भूमिका राष्ट्रवादीतील बहुतांश कार्यकर्त्यांनी पक्षाकडे मांडली, तर शहरात आता सेना स्वबळावर सत्ता आणेल, असा विश्वास शिवसैनिकांना असल्याने तिकडूनही फारशी उत्सुकता आघाडीसाठी दिसून येत नाही. तिसरा घटक पक्ष काँग्रेस काय भूमिका घेणार, हाही मुद्दा महत्त्वाचा राहणार आहे.
चौकट -
महिलांचा संघटनेत समावेश
पालिका निवडणुकीत महिलांना ५० टक्के जागा आहेत. म्हणजे १७ पैकी ९ जागांवर महिलांना संधी आहे. त्यासाठी ॲक्टिव्ह महिला पक्षात असणे गरजेचे आहे. यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी आता निवडणुकांच्या तोंडावर महिला पदाधिकारी घोषित केले आहेत. त्यांना नियुक्ती देऊन पक्ष कार्यक्रमांचे आमंत्रण दिले जात आहे. हा सन्मान निवडणुकीपुरता न राहता त्यांना नियमित पक्ष तसेच पालिकेत काम करण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे. काही अपवाद सोडला तर नगरसेविका म्हणून निवडून येऊनही त्यांना फक्त बैठका व पालिकेच्या कार्यक्रमापुरतेच मर्यादित ठेवले जात असल्याचे दिसते आहे.
चौकट -
शिवसेनेत काय चाललंय!
शिवसेनेच्या एका नगरसेवकासह काही जणांवर परवा वाळू चोरीप्रकरणी कळंब पोलिसांत गुन्हा दाखल झाला. हा विषय शहरात चर्चेचा झाला होता. ऐन निवडणुकीच्या तयारीत असताना पक्षाच्या नगरसेवकाचे अशा प्रकरणात नाव आल्याने कार्यकर्त्यात अस्वस्थता आहे. काही पदाधिकाऱ्यांना बदलावे, यासाठी शिवसैनिकांचे शहरातील शिष्टमंडळाने खा. ओमराजे यांना साकडे घातल्याची माहिती आहे. शिवसेनेत पदाधिकारी थेट मुंबईहून नियुक्त होतात, तिकडे गेल्यावर बघू, असे म्हणून खासदारांनी हा विषय सध्या वेटिंगवर ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांना नारळ मिळतो की निवडणुका झाल्यानंतर त्यांचा पत्ता कट होतो, हे काही दिवसांत समोर येईल. पण, त्यामुळे शिवसेनेत सध्या अंतर्गत मोठ्या हालचाली चालू असल्याचे दिसत आहे.