उस्मानाबाद -तालुक्यातील धारूर ग्रामपंचायतीत झालेल्या कामांची चाैकशी करून दाेषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी थेट पंचायत समितीच्या आवारात उपसरपंच गणेश जगताप यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पाेलीस वेळीच दाखल झाल्याने माेठा अनर्थ टळला.
धारूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीपुरवठा याेजनेची दुरुस्ती व अनुषंगिक कामे, मागासवर्गीय बांधवांच्या वस्तीत बाेरवेल व पाईपालईन घेणे, गावांतर्गत नवीन पाईपलाईन, ग्रामपंचायत कार्यालयात इंटेरियर डिझाईन व विद्युत पुरवठा करणे आदी आठ कामांची चाैकशी करण्यात यावी, कामांच्या माेजमाप पुस्तिकेची झेराॅक्स उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी उपसरंच गणेश ज्ञानदेव जगताप यांनी केली हाेती. याबाबतचे निवेदन २ सप्टेंबर राेजी गटविकास अधिकारी यांना दिले हाेते. निवेदनाच्या अनुषंगाने कार्यवाही न झाल्यास पंचायत समिती कार्यालयात आत्मदहन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला हाेता. दरम्यान, प्रशासनाकडून मागण्यांचा गांभीर्याने विचार झाला नसल्याचे सांगत गुरुवारी जगताप यांनी थेट पंचायत समिती कार्यालयात घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु, पाेलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने माेठा अनर्थ टळला. या वेळी उपस्थितांनी पंचायत समितीच्या कारभारचा निषेधही नाेंदविला.