येणेगूर : येणेगूर परिसरातील नळवाडी, दाळिंब, महालिंगरायवाडी, तुगाव, सुपतगाव शिवारातील रबीची पिके जोमदार आहेत. सध्या हरभरा काढणीचा हंगाम चालू असून, ज्वारी, गहू, करडई आदी पिके दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. असे असतानाच ज्वारीच्या ताटातून काळी कणसे बाहेर पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ज्वारी खाण्यासाठी तर ज्वारीची ताटे जनावरांना कडबा म्हणून वापरतात आणली जातात; परंतु काळ्या कणसांतील कवक बाहेर पडून त्यांची इतर सदृढ कणसांना बाधा पोहचत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. ही काळी कणसे जनावरांना खाण्यासाठी टाकली असता जनावरांना बुळकांड्यासारखा आजार होतो, तर माणसांनाही याच्या कवकयुक्त ज्वारीची भाकरी खाल्ल्यास पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशी काळी कणसे असलेली ताटे उपटून जाळून नष्ट करावीत व पेरणी पूर्वी बियाणास गंधकाची बुकटी चोळावी, असा सल्ला कृषी सहायक अतुल गायकवाड व नितीन चेंडकाळे यांनी दिला आहे.