ईट : भूम तालुक्यातील आंदरुड येथील मूळ गावठाण हद्दीतील सिंगल फेज ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्यामुळे मागील चार दिवसापासून या भागातील वीज पुरवठा खंडित आहे. यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईसह इतरही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आंदरुड येथे गावातील वीजपुरवठ्यासाठी मूळ गावठाणमध्ये वीज वितरण कंपनीचा सिंगल फेज ट्रान्सफर्मर आहे. यामध्ये सतत बिघाड होत असून, गेल्या पाच दिवसापासून तो बंदच आहे. याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद सदस्य प्रा. ज्ञानेश्वर गीते यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे पाठपुरावा केला. मात्र, कनिष्ठ अभियंता हजर राहत नाहीत. तसेच आंदरुड गावासाठी दिलेले वाहिनी मदतनीसही सतत गैरहजर असल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे. संबंधित कामाच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला असता, त्या कर्मचाऱ्यांची रजा आहे असे सांगून गैरहजर कर्मचाऱ्यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप प्रा. गीते यांनी केला आहे. त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्याची चौकशी करून सुरळीत वीजपुरवठा करावा अन्यथा वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही प्रा. गीते यांनी दिला आहे