निवडणुका म्हटल्या की, युवकांचा सहभाग अन् युवकांना हाताळण्यासाठी काही मंडळी त्यांना मद्याचे आमिष दाखवितात. त्यामुळे निवडणुकीच्या काळात मद्यविक्रीचा आलेख चढता असतो. १५ जानेवारी रोजी कळंब तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यापैकी बहुतांश गावात नवीन हॉटेल, टपऱ्या आता उगवल्या आहेत, शिवाय मोठ्या गावात ढाबे वाढले आहेत. काही गावांत परवानाधारक मद्यविक्रीची दुकाने असतानाही या ढाब्यांवर अवैध मद्यविक्री जोमाने चालू आहे. कळंब शहर व तालुक्यात जिल्ह्याच्या इतर ठिकाणापेक्षा मद्यविक्रीची दुकाने तुलनेने जास्त आहेत. त्यामुळे मद्यविक्रीत तालुक्यात मोठी उलाढाल होते. त्यातून मोठा महसूल शासनाला मिळतो, परंतु त्याचा सामाजिक तोटाही वाढतो आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
चौकट -
शिराढोण परिसर बनला ‘हॉटस्पॉट’?
तालुक्यातील शिराढोण परिसरात गावठीच्या अनेक बेकायदेशीर ‘फॅक्टऱ्या’ कार्यरत असल्याचे उघड गुपित आहे. त्यावर कधी-कधी कार्यवाही होते, पण त्यांचे उत्पादन नियमित चालू असल्याचे त्या भागातील लोक सांगतात. हा माल उस्मानाबाद, लातूर, बीड या भागांत पाठविला जात असल्याचीही माहिती आहे.