उमरगा/लोहारा : पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळेच शेती व्यवसाय अडचणीत सापडला असून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित आहेत. हे चित्र बदल्याणसाठी शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकरी आत्महत्या थांबण्याच मदत होईल, असा विश्वास राज्याचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल (वस्त्र उद्योग) यांनी व्यक्त केला. पोरवाल यांनी गुरूवारी तालुक्यातील माडजसह अन्य गावांना भेटी देवून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये बैठकही घेण्यात आली. या बैठकीनंतर पोरवाल यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, आ. ज्ञानराज चौगुले, उपविभागीय अधिकारी निलेश श्रिंगी, तहसीलदार ज्योती चव्हाण, गटविकास अधिकारी बी. बी. खंडागळे यांची उपसिथताी होती.पोरवाल म्हणाले की, अत्यल्प पावसामुळे शेती पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पादनातून खर्च निघणेही कठीण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. सातत्याची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळूनच शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊ उचलित आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंवर्धन हा महत्वपूर्ण उपाय असल्याचे सांगत पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब साठविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याचाच एक भाग म्हणून शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. यामाध्यमातून नाला सरळीकरण, खोलीकरण, शेततळे, गाळ काढणे, सामाजिक वनीकरण आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. (वार्ताहर) भावना शासनापर्यंत पोहोंचवूअपर मुख्य सचिव पोरवाल यांनी लोहारा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. शेतकरी मनोहर येल्लोरे यांनी सततच्या नापिकीला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेवून आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियास शासनाचे अर्थसहाय्य मिळाले असले तरी हे कुटुंब आज उघड्यावर आले आहे. पोरवाल यांनी येल्लोरे यांच्या पत्नी भारतबाई येल्लोरे, मुलगा अनिल यांच्याशी चर्चा करून परिस्थित जाणून घेतली. ‘कुटुंबियांच्या भावना शासनापर्यंत पोहोंचविल्या जातील’, असे पोरवाल यांनी यावेळी सांगितले.
अल्प पावसामुळेच शेती व्यवसाय अडचणीत
By admin | Updated: May 15, 2015 00:49 IST