नळदुर्ग : वारंवार निवेदने देऊनही नगरपालिका येथील मराठा गल्लीतील रस्ते दुरुस्ती व बांधणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत, या भागातील रहिवाशांनी १३ सप्टेंबर रोजी रस्त्यावरील खड्ड्यांत बेशरम लागवड करून प्रशासनाचा निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील चार वर्षांपासून मराठा गल्लीतील रस्ते खराब बनले असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. यासंदर्भात रहिवाशांनी पालिकेला अर्ज, विनंत्या करूनही नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने रहिवाशांनी गुरुवारी पालिकेला निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, नगरसेवक, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे या भागातील रस्त्याचे काम होत नाही. त्यामुळे या रस्त्याच्या मागणीसाठी नागरिक व शिवशाही तरुण मंडळाच्यावतीने १३ सप्टेंबर रोजी चावडी चौकापासून ते मराठा गल्लीपर्यंत बेशरम लागवड करून पालिकेचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.
मराठा गल्लीत नेहमीच ज्ञानेश्वरी पारायण, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासारखे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. शिवाय या रस्त्यावरून गणेश विसर्जन मिरवणूक निघते, येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी अबाल-वृद्ध येत असतात. त्यांनाही रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. असे असतानाही पालिका दुर्लक्ष करीत असल्याने पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी बेशरम लागवड करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर शिवाशाही तरुण मंडळाचे अध्यक्ष पंकज हजारे, उपाध्यक्ष निखिल येडगे, श्रीकांत सावंत, कोषाध्यक्ष संतोष मुळे, सचिव सहदेव जगताप, सहसचिव आकाश काळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.