रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
लोहारा : तालुक्यातील हिप्परगा रवा ते लोहारा रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.
हिप्परगा रवा ते लोहारा हा रस्ता पाच किलोमीटरचा असून, वनिकरण ते नागराळ शिवारापर्यंत डांबरी रस्ता उखडला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर दगड आले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सध्या साखर कारखान्यांचे गाळप सुरू असल्यामुळे ऊस वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. विशेषत: बैलगाडी व ट्रॅक्टरची वाहतूक अधिक असल्याने ट्रॅक्टर उलटून अपघाताचा धोका वाढला आहे. सोमवारी एक ट्रॅक्टर उलटला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. परंतु, वाहनाचे व ऊसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून करण्यात येत आहे.
चौकट..........
हिप्परगा रवा ते लोहारा रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे अपघात होत आहेत. त्यामुळे रोजच शेतकरी आणि वाहनमालक या पडलेल्या खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करून वाहन कसेबसे पुढे नेतात. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी.
- जीवन होनाळकर, हिप्परगा रवा