परंड्याला ४२ महिन्यांपासून कायमस्वरूपी पशुधन विकास अधिकारी मिळेनात
परंडा : जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापतींच्या तालुक्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्त आहेत. तब्बल ७३ हजारांहून अधिक पशुधन असलेल्या या तालुक्याच्या पशुधन केंद्राला मागील ४२ महिन्यांपासून कायमस्वरूपी पशुधन विकास अधिकारीही मिळत नसून, सप्ताहभरात एखादा दिवस प्रभारी अधिकारी भेट देत असल्याने पशुधनाचे आरोग्य संकटात आले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पशुधन असलेल्या पशुवैद्यकीय केंद्रात परंडा तालुका हा महत्त्वाचा समजला जातो. पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत ७३ हजारांहून अधिक पशुधन आहे. मात्र, पशुधनाची निगा राखण्यासाठी मागील ४२ महिन्यांपासून नियमित पशुधन विकास अधिकारी नाही. २०१७ मध्ये डॉ. अशोक फड यांची बदली झाली. त्यानंतर येथे पशुधन विकास अधिकारी रुजू झाले नाहीत. गेल्या साडेतीन वर्षांपासून हे पद रिक्त आहे. नियमित पशुवैद्यकीय अधिकारी मिळावा यासाठी पशुपालकांसह विविध संघटना पाठपुरावा करीत आहेत. सद्य:स्थितीत भूम येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. दत्तात्रय इंगोले यांच्याकडे येथील प्रभारी पदभार देण्यात आला असून, तेही आठवड्यातून एखाद्यावेळी इकडे चक्कर मारतात. पशुसंवर्धन सभापती म्हणून जिल्ह्याचा कारभार हाकणारे दत्ता साळुंके यांच्या तालुक्यातच पशुपालकांना खाजगी पशुचिकित्सकांची खर्चिक सेवा घ्यावी लागत आहे. एकीकडे फिरते पशुवैद्यकीय केंद्र सुरू करण्याची लालसा दाखविणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला नियमित पशुसंवर्धन अधिकारी देता येत नसल्याने ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवा ओस पडली आहे. याकामी पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पशुपालकांतून होत आहे.
रिक्त पदे........
सद्य:स्थितीत परंडा, सोनारी आणि शेळगाव या तिन्ही ठिकाणचे पशुधन विकास अधिकारी हे पद रिक्त आहे. याशिवाय, वाकडी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ मधील सहायक पशुधन विकास अधिकारी, अनाळा येथील परिचारकाचे एक, तर सोनारी येथील व्रणोपचारक हे एक पद रिक्त आहे.
कोट.....
परंडा तालुक्यातील एकाही प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय केंद्रात कायमस्वरूपी पशुधन विकास अधिकारी नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा सर्वाधिक फटका सीना-भीमा जोड कालवा लाभक्षेत्रातील पशुपालकांना बसत आहे. जिल्हा परिषदेने तात्काळ नियमित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.
- सचिन पाटील, तालुका कार्याध्यक्ष, रायुकाँ
कोट....
१७ जानेवारी २०२० रोजी कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून मी पदभार स्वीकारला. त्यावेळी ४८ पैकी पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या २८ जागा रिक्त होत्या. या जागा भरण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. सर्वप्रथम कॉन्ट्रॅक्ट बेसवर जागा भरण्यासाठी ठराव मंजूर करून आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठविला. शासनाने पदभरतीला मान्यता दिली आहे. याकामी एका संस्थेला कंत्राट देण्यात आले असून, या संस्थेच्या माध्यमातून येत्या आठ ते दहा दिवसांत जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- दत्ता साळुंके, सभापती, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग
200721\psx_20210717_170019.jpg
पशुसंवर्धन कार्यालय फोटो परंडा....