उस्मानाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीतून सोमवारी माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी ७ तालुक्यांतून तब्बल २ हजार २१३ जणांनी आपले अर्ज काढून घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या जवळपास दहा हजार जणांपैकी आता ६ हजार जण रिंगणात राहिले आहेत. यातही बरेचसे सदस्य समोर एकही अर्ज न राहिल्याने बिनविरोध निघाले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यातील जवळपास ४० हून अधिक ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. एकूण १३७७ प्रभागांतील ३ हजार ६५२ सदस्यांसाठी ही निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी ९ हजार ९४७ अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती यातील १५७ अर्ज अवैध ठरले. यानंतर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी शुक्रवार व सोमवार असे दोन इच्छुकांना मिळाले. दरम्यानच्या काळात दोन दिवस मिळाल्याने अनेकांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांची मनधरणी केली. यात यश आल्यानंतर सोमवारी अखेरच्या दिवसापर्यंत भूम वगळता इतर ७ तालुक्यांतील २ हजार २१३ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे ६ हजार ९६ अर्ज शिल्लक राहिले आहेत. संबंधितांना चिन्हांचे वाटपही सोमवारी सायंकाळपर्यंत करण्यात आले. त्यामुळे लागलीच मंगळवारपासून उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा ग्रामीण भागात उडविल्याचे पाहायला मिळाले.
बिनविरोधमध्ये उमरगा, लोहाऱ्याचा डंका...
जिल्ह्यात ४२८ पैकी ४० ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. यामध्ये उमरगा अन् लोहारा तालुक्याने आदर्श घालून दिला. उमरगा तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींपैकी ११ बिनविरोध काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे ३८ गावांतच निवडणुका होतील. त्यापाठोपाठ सर्वात कमी २६ ग्रामपंचायती असलेल्या लोहारा तालुक्यातही ५ बिनविरोध निघाल्या. येथे २१ गावांतच निवडणुका होतील. याशिवाय उस्मानाबाद ३, तुळजापूर ४, कळंब ६, वाशी १, भूम ५ तर परंडा तालुक्यातही ५ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत.
४७७ सदस्य जिंकले...
उस्मानाबाद तालुक्यात बिनविरोध ग्रामपंचायतींचे २४ तर एकही अर्ज समोर राहिला नसल्याने १५ सदस्य बिनविरोध झाले आहेत. तुळजापूर तालुक्यात ३५, उमरगा तालुक्यात सर्वाधिक १३१, लोहारा तालुक्यात ८२, कळंब ७९, वाशी ५७ तर परंडा तालुक्यात ५४ सदस्य बिनविरोध निवडले गेले. त्यांची अधिकृत घोषणा बाकी आहे. यामध्ये केवळ भूम तालुक्यातील आकडेवारी प्रशासनाकडे अपडेट झाली नव्हती. ती झाल्यास बिनविरोध सदस्यसंख्या वाढेल.
भूममध्ये प्रशासन हतबल...
भूम तालुक्यातील आकडेवारीचा घोळ मंगळवारी सायंकाळ उलटली तरी मार्गी लागलेला नव्हता. त्यामुळे या तालुक्यातील किती सदस्य बिनविरोध निघाले, किती इच्छुकांनी माघार घेतली व किती उमेदवार रिंगणात राहिले, याचा मेळ लागलेला नव्हता.