उस्मानाबाद : जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. या काळात आरोग्य सेवेवरील ताण कमी करण्यासाठी तसेच रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कोरोनाच्या काळात ६९९ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता निधीच्या कमतरतेचे कारण देत मागील काही महिन्यांमध्ये ४८२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर बेराेजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. एप्रिल २०२० पासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली होती. मे महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य सेवेवर ताण येत होता. या काळात रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले. तसेच खाजगी रुग्णालयेही अधिग्रहित करण्यात आले होते. या ठिकाणी सेवा बजावण्यासाठी ६९९ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. रुग्ण कमी झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात काही कर्मचारी कमी करण्यात आले. पुन्हा फेब्रुवारी महिन्यात रुग्ण वाढू लागल्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. जून महिन्यापासून दुसरी लाट ओसल्यानंतर कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. या ठिकाणी कार्यरत असलेले ४८२ कंत्राटी कर्मचारी कमी करण्यात आले. जिव धोक्यात घालून सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांवर कामासाठी भटकंती करण्याची वेळ ओढवली आहे. तर काही जण उपजिविका भागविण्यासाठी भाजी विक्री, चहा टपरी, शेतमजूर म्हणून काम करीत आहेत.
जिल्हा- उस्मानाबाद
कमी केलेले एकूण कर्मचारी - ४८२
डॉक्टर - ३४
नर्स - ११३
वॉर्डबॉय - ६०
तंत्रज्ञ - ५
इतर - ५
कमी केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याचा कोट
भूम येथील अरुणा गलांडे या परिचारिका म्हणून बार्शी येथील एका खाजगी रुग्णालयात काम करीत होत्या. त्यांना या ठिकाणी ७ हजार रुपये पगार मिळायचा, त्यांना उस्मानाबाद कोविड केअर सेंटरला सप्टेंबर २०२० मध्ये काम मिळाले. या ठिकाणी त्यांना १८ हजार रुपये मानधन मिळू लागले. जानेवारी महिन्यात रुग्ण कमी झाल्याने दोन महिन्याचा ब्रेक दिला. आता ऑगस्ट महिन्यात कामावरून कमी केले आहे. त्या बेरोजगार झाल्या. कोरोनामुळे त्याच्यावर दोनदा बेरोजगार होण्याची वेळ आली. आता त्या कामाचा शोध घेत आहेत. त्यांना काम मिळत नाही.
२ महिने वेतनच मिळाले नाही
भाजी विक्री करुन घरखर्च भागवत होता. कोविड काळात वॉर्डबॉय म्हणून सेवा बजावली. कामावरुन कमी करुन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. तरी अद्याप पगार मिळालेला नाही. त्यामुळे उसनवारी करावी लागत असल्याचे कंत्राटी कर्मचारी अक्षय पलंगे यांनी सांगितले.
कोट...
कोरोना काळात ६९९ कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. रुग्ण कमी झाल्याने सध्या २१७ कर्मचारी सेवेवर आहेत. उर्वरित ४८२ कार्यमुक्त करण्यात आले आहेत. रुग्ण वाढल्यानंतर कार्यमुक्त करण्यात आलेले कर्मचारी कामावर घेण्यात येतील.
डाॅ. धनंजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक