लोहारा (उस्मानाबाद) : तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याची झपाट्याने वाढ होत असल्याने २६ सप्टेंबर रोजी रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास प्रकल्प १०० टक्के भरला. त्यामुळे सुरुवातीला प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले. मात्र, पाण्याचा ओघ सुरूच असल्याने पुन्हा १२ व यानंतर सर्व चाैदा दरवाजे १० सेंटीमीटरने उचलण्यात आले. त्यामुळे प्रकल्पातून सुमारे ६ हजार ८९३.२९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.
लोहारा तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून पावसाच्या प्रमाणात घटच होत आली आहे. असे असतानाच यंदाही पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने ओढ दिली हाेती. त्यामुळे शेतकरी धास्तावले असतानाच मागील आठवडाभरापासून जिल्ह्याच्या सर्वच भागात दमदार पाऊस झाला आहे. तेर येथील तेरणा धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात झपाट्याने पाण्याची आवक वाढली आहे. १० सप्टेंबर रोजी प्रकल्पात ७९.४७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कता बाळगत पाणी केव्हाही सोडले जाईल म्हणून तेरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर २५ सप्टेंबरला पाण्याची आवक वाढत गेली. आणि २६ सप्टेंबर रोजी रविवारी पहाटे पाचच्या सुमारास प्रकल्प १०० टक्के भरला. संभाव्य धाेका लक्षात घेऊन सुरुवातीला प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले. परंतु, पाण्याची आवक सातत्याने वाढत गेल्याने उघडलेल्या दरवाजांची संख्या १२ वर नेली. यानंतरही आवक वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व चाैदा दरवाजे १० सेेंटीमीटरने उचलण्यात आले. यातून ६ हजार ८९३.२९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे, अशी माहिती शाखा अभियंता के. आर. येणगे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.
चाैकट...
सलग दुसऱ्या वर्षी उघडले सर्व दरवाजे...
माकणी निम्न तेरणा प्रकल्प यापूर्वी २३ सप्टेंबर २०१७ राेजी १०० टक्के भरला हाेता. त्यामुळे सर्व चाैदा दरवाजे उघडण्यात आले हाेते. यानंतर १४ सप्टेंबर २०२० राेजीही हा प्रकल्प तुडुंब भरला. तेव्हाही चाैदा दरवाजे उघडले हाेते. परत यंदाही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.
अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर...
दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग हाेत आहे. अशावेळी माकणी ते माताेळा तसेच सास्तूर ते गुबाळ हे रस्ते खबरदारीचा भाग म्हणून बंद करण्याचे निर्देश हाेते. त्यामुळे पहाटेपासूनच तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्यासह पाेलीस कर्मचारी रस्त्यावर थांबले हाेते. तहसीलदार संताेष रुईकर हे रात्रभर यंत्रणेच्या संपर्कात हाेते.
पाणीप्रश्न मिटला...
माकणी निम्न तेरणा प्रकल्पावर लोहारा, उमरगा, औसा, निलंगा तालुक्यातील शंभरवर गावांना पाणीपुरवठा होतो. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.